मणेराजुरीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये | आ.जयंत पाटील यांनी विभाग नियंत्रकांना खडसावले : कवठेमहांकाळ आगाराच्या व्यवस्थापकांवर कारवाई करा
तासगाव तालुक्यातील मनेराजुरी, योगेवाडी या परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांनी बससाठी अनेकवेळा रास्ता रोकोही केला आहे. मात्र तासगाव आणि कवठेमहांकाळ आगाराच्या कारभारात सुधारणा झाली नाही. यापुढील काळात मनेराजुरीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये. ती खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांनी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना खडसावले. शिवाय लोकप्रतिनिधींबद्दल अनुद्गार काढणाऱ्या कवठेमहांकाळ आगाराच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांच्यावर कारवाई करा, अशीही सूचना आमदार पाटील यांनी भोकरे यांना दिली.
तालुक्यातील मनेराजुरी, योगेवाडी या भागातील शेकडो विद्यार्थी दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी तासगाव येथे येत असतात. या विद्यार्थ्यांना कवठेमहांकाळ आगाराच्या बसमधून यावे लागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तासगाव आणि कवठेमहांकाळ आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलडले आहे. विद्यार्थ्यांना एकही बस वेळेत मिळत नाही. एखादी बस आली तर ती फुल्ल भरून येते. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दोन - दोन तीन - तीन तास बस स्थानकावर वाट पाहूनही बस मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
विद्यार्थ्यांनी बससाठी यापूर्वी अनेक वेळा रास्ता रोकोचे हत्यार उपसले आहे. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले आहे. शिवाय कवठेमहांकाळ आगाराने आमची फसवणूक केली आहे, अशा आशयाच्या सुमारे 81 तक्रारी तासगाव पोलिसांकडे दाखल केल्या आहेत. या प्रकरणात माजी पालकमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी आता लक्ष घातले आहे. बुधवारी आमदार पाटील यांनी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांची भेट घेतली.
मनेराजुरी, योगीवाडी या भागातून शेकडो विद्यार्थी दररोज तासगावला येत असतात. मात्र तासगाव आणि कवठेमहांकाळ आगाराकडून या विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा उपलब्ध करून दिली जात नाही, याबद्दल आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढील काळात विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे, अशा सक्त सूचना दिल्या. यावेळी भोकरे यांनी गणपतीसाठी जिल्ह्यातून सुमारे 200 बसेस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात गैरसोयी झाल्याचे मान्य केले. मात्र यापुढील काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घेऊ असे सांगितले.यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, तासगाव बाजार समितीचे संचालक रामचंद्र उर्फ खंडू पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील उपस्थित होते.
कवठेमहांकाळ आगार व्यवस्थापकांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू : भोकरे
कवठेमहांकाळ आगाराच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांच्याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी तक्रार केली. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना याबाबत जाब विचारला तरी त्या लोकप्रतिनिधींशी व्यवस्थित बोलत नाहीत. लोकप्रतिनिधींबद्दल उलट - सुलट वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. यावर आगार व्यवस्थापकावर कारवाईचे अधिकार माझ्याकडे नाहीत. ते वरिष्ठांकडे आहेत. याबाबत वरिष्ठांकडे किरगत यांच्या विरोधातील तक्रारींचा अहवाल पाठवू, असे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले.
योगेवाडी - तासगाव बस सुरू करा : जयंत पाटील*
तालुक्यातील मनेराजुरी, योगेवाडी येथील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीतील बस अपुऱ्या पडत आहेत. कवठेमहांकाळ येथून येणाऱ्या बसेस फुल भरून येत आहेत. त्यामुळे आगामी काळात या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी योगेवाडी ते तासगाव अशी बस महाविद्यालयीन वेळेत सुरू करा, अशी सूचना आमदार जयंत पाटील यांनी विभाग नियंत्रण सुनील भोकरे यांना दिली. त्यांनी ती मान्य केली. लवकरच या मार्गावर नवीन बस सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.