Header Ads

दोन म्हैशीसह दोन बैल, रेडकू जखमी ; वनविभागाकडून पंचनामा | शिरगावात तरसांच्या हल्ल्यात कोल्ह्याचा मृत्यू


तासगाव : शिरगाव (वि) (ता. तासगाव) येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन तरसांनी केलेल्या हल्ल्यात एका कोल्ह्याचा मृत्यू झाला. तर दोन म्हैशीसह दोन बैल आणि एक रेडकू जखमी झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने धाव घेऊन पंचनामा केला. 

      
वनरक्षक रवींद्र कोळी यांनी तेथील पायांचे ठसे तरसाचे असल्याचे सांगितले. तसेच दोन तरस आणि कोल्हा यांच्यात झालेल्या झटापटीत कोल्ह्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली.


       
तालुक्यातील शिरगाव येथे दिपक पाटील व दिनकर पाटील यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्याच्या बाजूस ऊसाची शेती आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन तरसांनी गोठ्यातील जनावरांवर हल्ला केला. हल्ल्यात दोन बैल आणि दोन म्हशी आणि एक रेडकू जखमी झाले. परंतू जनावरांनी प्रतिकार केल्याने तरसांची जोडी परत फिरली.        


गोठ्यातून तरस परत फिरताच कोल्हा व  तरस यांच्यात झटापट होऊन कोल्ह्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वनविभागाच्या अधिका-यांनी वर्तवली. वनविभागाचे वनरक्षक रवींद्र कोळी, दत्तात्रय बोराडे व वनपाल जयसिंग महाडीक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी व पंचनामा केला. सर्व ग्रामस्थानी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिका-यांनी केले आहे. कोल्ह्याचा मृतदेह वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.