तासगाव तालुक्यात लहान मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा | पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांची माहिती : पालकांनी घाबरून जाऊ नये
तासगाव : तासगाव तालुक्यात लहान मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरवण्यात येत आहे. सोशल मीडियावर तसे मेसेज फिरत आहेत. मात्र या मेसेजमध्ये काहीही तथ्य नाही. त्यामुळे पालकांनी या मेसेजवर विश्वास ठेवू नये. काही संशयास्पद आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी केले आहे.
झाडे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विविध समाज माध्यमांवर लहान मुले पळवणारी टोळी आल्याचा मेसेज फिरत आहे. त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण आहे. मात्र तालुक्यात कुठेही मुले पळवल्याची घटना घडली नाही. सोशल मीडियावरून फिरणारे मेसेज चुकीचे आहेत. अशा अफवा पसरवनाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. ठिकठिकाणी पोलीस डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंकास्पद आढळून आल्यास पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन झाडे यांनी केले.