हिजाबच्या कठोर नियमांच्या विरोधात इराणमधील महिलांचे आंदोलन
कर्नाटकातील काही कॉलेजमध्ये मुलींना हिजाब घालून येण्यास बंदी घातल्यानंतर आम्हाला हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यास परवानगी मिळावी यासाठी मुलींनी मोठे आंदोलन केले होते. कर्नाटकात सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण देशभर पसरले होते. अखेर प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने निर्णय दिला की शाळा कॉलेजमध्ये शाळा कॉलेजसने जो युनिफॉर्म ठरवलेला आहे तोच विद्यार्थिनींना परिधान करावा लागेल. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच या प्रकरणावर पडदा पडला. आपल्या देशात हिजाब परिधान करण्यास मिळावा म्हणून आंदोलन होत असताना तिकडे इराण सारख्या कट्टर मुस्लिम देशात मात्र याच्या नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे.
इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिला रस्त्यांवर उतरून उग्र आंदोलने करीत आहेत. इराणमध्ये हिजाब संदर्भात खूप कठोर नियम आहेत. इराण हे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र असल्याने तेथील महिलांसाठी कठोर ड्रेस कोड आहेत. १९७९ साली इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली तेंव्हापासून तिथे महिलांच्या ड्रेस संदर्भात कठोर नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना थेट अटक करून तुरुंगात डांबले जाते. योग्य प्रकारे हिजाब घातला नाही या कारणाने आजवर लाखो महिलांना आरोपी ठरवले गेले असून शेकडो महिलांना अटक करण्यात आली आहे. हिजाबच्या कठोर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका २२ वर्षीय मुलीला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला.
त्या मुलीचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असे तेथील पोलिसांसाकडून सांगण्यात येत असले तरी पोलिसांच्या मारहाणीतच त्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे तेथील महिलांचे मत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी इराणमधील महिला रस्त्यांवर उतरून आंदोलने करू लागली. या आंदोलनात महिलांनी कठोर हिजाब निर्बंधांना देखील विरोध केला. कठोर हिजाबच्या विरोधात इराणची राजधानी असलेल्या तेहरान या शहरासह सर्वच महत्वाच्या शहरात महिलांनी आंदोलने केली. कुरदीस्तान या शहरात आंदोलन चालू असताना सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारानंतर हे आंदोलन आणखी तीव्र होत आहे. इराणमध्ये हिजाब विरोधातील हे पहिलेच आंदोलन नाही
२०१९ मध्येही इराणमध्ये अशाप्रकारचे आंदोलने झाले होते. यावेळी मात्र हे आंदोलन खूप तीव्र झाले असून महिला हिजाब सोबतच तेथील हुकूमशाही सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरून घोषणा देत आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे इस्लामचे तज्ञ मानले जातात आणि शरिया कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यावर विश्वास ठेवतात. ते हे आंदोलन कशाप्रकारे हाताळतात याकडे सपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे