Header Ads

लंपी स्कीन विषाणूजन्य आजारांवर लसीकरण, उपचार करावे | - विकास साबळे


जत : सध्या सर्व महाराष्ट्रभर लंपी स्कीन या आजारामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू होत आहे.शासनाने या विषाणूजन्य आजारांवर लसीकरण व उपचार करावे,अशी मागणी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.


साबळे म्हणाले,लंपी हा आजार विषाणूजन्य चर्मरोगाचा असून संसर्गजन्य असल्यामुळे हवेतून व संसर्गामुळे जास्तीत जास्त पसरण्याचा धोका असल्याने सर्व जनावर बाजार बंद करावेत. या रोगा संदर्भात असणाऱ्या लक्षणांची खेडोपाडी जनजागृती करावी. माशा, गोचीड, चिलट यांच्यामुळे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यामुळे ग्रामपंचायत,नगरपालिका यांचे मार्फत औषधाची फवारणी करून स्वच्छता ठेवावी, अशा सूचना देण्यात याव्यात.


जत तालुक्यात सर्वसाधारणपणे चार ते पाच लाख लहान मोठ्या जनावरांचे संख्या असून बरेच शेतकऱ्यांची कुटुंब व उदरनिर्वाह या जनावरांच्या वरती अवलंबून आहे.त्यामुळे जनावर दगावल्यास या गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते,अशी  परिस्थिती सध्या जाणवत असल्याने तालुक्यातील सर्व पशुधनांना वेळीच लसीकरण करून घ्यावे.उपचारासाठी शासकीय दवाखान्यातून आवश्यक असणारी सर्व ती औषध उपचार यंत्रणा ग्रामीण भागापर्यंत ताबडतोब पोहचविण्याची व्यवस्था करावी,म्हणजे पशुधन वाचण्यास मदत होईल आणि तालुक्यातील गोरगरीब,मागासवर्गीय जनतेला आधार मिळेल,असेही साबळे म्हणाले.
Blogger द्वारे प्रायोजित.