Header Ads

कवठेमहांकाळ मध्ये रिंगण सोहळा संपन्न


कवठेमहांकाळ : ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगाचा गजर,डौलाने फडकणार्‍या भगव्या पताका़ अश्‍वांच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी उडालेली झुंबड,देहभान वय विसरून नाचणारे भाविक अशा भक्‍तिमय चैतन्यदायी वातावरणात माऊलीच्या पालखीचा रिंगण सोहळा शहरातील महांकाली हायस्कूलच्या पटांगणावर बुधवारी संपन्‍न झाला. 

हजारो भाविकांनी हा सोहळा आपल्या नयनात साठवून ठेवला.शहरातील श्री हरी मंदिरामध्ये श्री अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यानिमित्त माऊलीच्या अश्वाचा गोल रिंगण व उभे रिंगण सोहळा संपन्न झाला.गेले आठवडाभर ज्ञानेश्वरी पारायणनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बुधवारी या कार्यक्रमाची रिंगण सोहळा होऊन सांगता झाली  .


उभे रिंगण सोहळा शहरातील बाजारपेठेत तर गोल रिंगण सोहळा श्री महांकाली हायस्कूलच्या पटांगणावर पार पडला.या सोहळ्यात सजविलेला अश्व,भगवी पताका हाती घेतलेले वारकरी,महांकाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेली माळकरी वेशभूषा आणि लोकनेते राजारामबापू पाटील प्राथमिक विद्यामंदिरच्या छोट्या चिमुकल्यांनी घातलेली दिंडी प्रदिक्षणा लक्ष वेधून घेत होते.वारकऱ्यांच्या कुस्त्या,महिलांच्या फुगड्या व मैदानी खेळात भाविक तल्लीन झाले होते.हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी कवठेमहांकाळ शहर व पंचक्रोशीतील महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Blogger द्वारा समर्थित.