Header Ads

बहुमुखी प्रतिभेचा कलावंत हरपला!


हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावनकुमार टाक यांचे गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.   त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीतील एक बहुमुखी  प्रतिभेचा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. ८० च्या दशकात सावन कुमार टाक यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. जवळपास चार दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आपल्या चार दशकांहून अधिक  काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी संजीव कुमार यांच्या पासून सलमान खान यांच्यापर्यंत सर्वच कलाकारांबरोबर काम केले होते. नैनिहाल हा सावन कुमार यांनी  निर्मित केलेला पहिला चित्रपट होता  या चित्रपटात संजीव कुमार यांनी महत्वाची भूमिका साकारली  होती.  


सावन कुमार टाक यांनी १९७२ साली  मीना कुमारी यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्रीला सोबत घहेउन पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. त्या चित्रपटाचे नाव होते गोमती के किनारे. सावन कुमार टाक यांनी संजीव कुमार, मीना कुमारी यांच्याशिवाय राजेश खन्ना, जितेंद्र, जयाप्रदा, पद्मिनी कोल्हापूरे, नितु सिंग, शत्रुघ्न सिन्हा,  सलमान खान यांच्यासोबतही काम केले. त्यांनी निर्मिती आणि  दिग्दर्शित केलेले सबक, हवस, गोमती के किनारे, सजन की सहेली, सनम बेवफा, बेवफा से वफा, खलनायिका, माँ,  सलमा पे दिल आ गया,  सनम हरजाई, साजन बिन सुहागण, बेटी, चांद का तुकडा, सौतन, सावन यासारखे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. ते आपल्या चित्रपटात नेहमीच नव्या कलाकारांना संधी देत. त्यांच्यामुळेच हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक उत्तमोत्तम कलाकार मिळाले. त्यांच्या चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक संदेशही दिला जात. त्यांचे अधिकतर चित्रपट हे महिलांवर आधारित होते. 


सावन कुमार टाक हे निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असले तरी ते उत्तम गीतकार होते. त्यांच्या चित्रपटातील गाणी मधुर असत. त्यांचा सौतन हा चित्रपट तर केवळ गाण्यांमुळे गाजला. शायद मेरी शादी का खयाल ...  हे सौतन  चित्रपटातील  गाणे त्या काळी खूप गाजले. जिंदगी प्यार का गीत है.... हे गाणे देखील त्या काळात खूप गाजले.  हवस चित्रपटातील 'तेरी गलिओ मे ना रखेंगे कदम.....हे गाणे देखील खूप गाजले. हृतिक रोशनच्या काहो ना प्यार है या चित्रपटात देखील त्यांनी काही गाणी लिहिली आहे.  त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीची खूप मोठी हानी झाली आहे. बहुमुखी प्रतिभेची देणगी लाभलेल्या सावन कुमार टाक यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 


श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Blogger द्वारे प्रायोजित.