Header Ads

कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे निलंबित; राज्य शासनाची कारवाई


सांगली : ताकारी व म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाचा कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि खासगी बांधकाम व्यावसायिक राहुल कणेगावकर यांना एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर नलवडेला गुरुवारी निलंबित करण्यात आले. निलंबन कालावधीत सांगलीचे मुख्यालय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.


सांगलीतील वारणालीमधील शासकीय कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, उपाहारगृह, दुरुस्तीसाठी स्वच्छता कर्मचारी पुरविण्याची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा देण्यासाठी एक लाखाची लाच घेताना नलवडे आणि त्याचा भाचा कणेगावकर यांना रंगेहात पकडण्यात आले. येथील सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात ही कारवाई केली होती. 

या दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नलवडेला दि. ६ ऑगस्टरोजी अटक केली आहे. त्यानंतर विशेष न्यायाधीशांनी दि. २४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. नलवडेस ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (२) (अ) मधील तरतुदीनुसार पोलीस कोठडीत स्थानबद्ध केल्यापासून शासन सेवेतून निलंबित केले आहे, असे आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव अनिल देवकाते यांनी दिले आहेत.


नलवडेस सांगली मुख्यालयात हजर राहण्याची सूचना दिली आहे. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही शासन आदेशात म्हटले आहे."

Blogger द्वारे प्रायोजित.