Header Ads

रोगराई,महागाई व भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन जा गे मारबत!मारबत उत्सव ही नागपूरच्या इतिहासातील मोठी आणि ऐतिहासिक परंपरा आहे.मारबत उत्सवाची सुरूवात इंग्रजांच्या काळात सुरू करण्यात आली.यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना एकत्रित करून इंग्रजांविरूध्द मोठा लढा उभा करणे. कालांतराने हा उत्सव समाजातील वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे या सणाचे उद्दीष्ट ठरले.येणारे विघ्न दुर करण्यासाठी 1880 मध्ये काळ्या मारबतीची सुरूवात झाली.यानंतर 1884 मध्ये पिवळ्या मारबतीची सुरूवात झाली.आज काळ्या मारबतीला 142 वर्षे पूर्ण होत आहे तर पिवळ्या मारबतीला 137 वर्षे पूर्ण होत आहे हा एक इतिहासच म्हणावा लागेल.दोन्ही मारबती मांडण्या मागचा एकच उद्देश होता आणि आहे तो म्हणजे येणारे विघ्न, रोगराई, महागाई, दुष्काळ दूर व्हावा.नागपूरसाठी आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे आजही 142 वर्षे जुनी परंपरा त्याच पद्धतीने पारपाडल्या जाते.हा नागपूरच्या इतिहासातीलच नाही तर भारतीय इतिहासातील परंपरेची धरोहर म्हणावी लागेल.त्यामुळे  ही नागपुरकरांसाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे.त्याहीवेळेस मारबतीची सलग आठ दिवस पुजा-अर्चना व्हायची आणि आताही होते.


त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा होतात.असेही सांगण्यात येते की मारबत ही नवसाला पावणारी असल्याची अनेकांची श्रद्धा आहे.मारबतीच्या दर्शनासाठी अनेकजन नवजात शिशूचे तोंड मारबतीच्या स्तनाला लावण्याची देखील प्रथा आहे.त्यामुळे काळ्या मारबतीचा व पिवळ्या मारबतीला पारंपरिक पद्धतीने महत्त्व दील्या जाते.मारबतीचा सन पोळ्याच्या पाडव्याला म्हणजे तान्हया पोळ्याच्या दिवशी भव्य मिरवणूक काढुन येणाऱ्या विघ्नांच्या व विघटनकारी शक्तीच्या विरोधात जय घोष करून "ईडा-पीडा,माशा-मुरकुट्या, रोगराईला घेऊन जा गे मारबत" अशा घोषणा केल्या जाते व संपूर्ण शहराती नागरिक यात सहभागी होवून संपूर्ण नागपूर दुमदुमते.मोठ्या पोळ्याच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला घरोघरी मेड्यांच्या (पळसाचे) फांद्यांची पुजा केली जाते व दुसऱ्या दिवशी पाडव्याला चौका-चौकामध्ये पळसाच्या फांद्यांचे दहन केले जाते व घोषणा केली जाते "माशा-मुरकुट्या, रोगराईला घेऊन जा गे मारबत"अशा घोषणा केल्या जातात.


माझ्यामते सायंटिफिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या पळसाच्या पानांच्या धुर अवश्य जंतुनाशकाचे कार्य करीत असावे यात दुमत नाही.कालांतराने या दिवसाला एवढे महत्त्व आले  की भ्रष्ट व कलंकित राजनेता किंवा भ्रष्टाचारी यांच्या विरोधात त्याची प्रतीकृती काढून "बडगा" काढून निषेध केला जातो.त्याच प्रमाणे महागाई,अत्याचार, आतंकवाद, महामारी, बॅंक घोटाळे इत्यादींच्या  विरोधात बडग्याच्या रूपात  प्रतीकृती काढून निषेध नोंदविला जातो.यात अनेक सामाजिक संघटना (मंडळ) सहभागी होतात.पिवळ्या व काळ्या मारबतीच्या रूपाने आज अनेक विघटनकारी शक्तीचा,अत्याचाराचा विरोध करून समाजात जनजागृती करण्याची काळ्या व पिवळ्या मारबतीपासुनच परंपरा मिळाली आहे असे मी समजतो.कारण यामुळे समाजात राजकीय पुढारी,अत्याचारी, भ्रष्टाचारी कोणते घृणास्पद कार्य करतात हे संपूर्ण उघडपणे बडग्याच्या रूपात आपल्याला व देशाला पहायला मिळते व यामुळे समाजात जनजागृती होत असते. म्हणजेच मारबत हा सन समाज जागृतीचा मोठा दिवस असल्याचे मी समजतो.कारण यामुळे राजकीय पुढाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पोल-खोल होत असते.आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1897 मध्ये प्लेगची साथ आली होती.त्यानंतर 1928 मध्ये नागपूरात हिंदू-मुस्लिम दंगल मोठ्या प्रमाणात भडकली होती.तरीही या दोन्ही वर्षी मारबत उत्सवात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही.


परंतु मागील 2 वर्षात  करोना महामारीने पहिल्यांदाच मारबत उत्सवातील मिरवणुकीत विग्घ निर्माण केले.परंतु यावर्षी करोना महामारी संपुष्टात आल्यामुळे देशातील संपूर्ण धर्माचे सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे होत आहे.त्यामुळे यावर्षी आपल्याला मारबत उत्सव पहायला मिळेल .मुख्यत्वे करून समाजातील वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे मारबत उत्सव या सनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.मारबत उत्सवात बडग्यांची भुमिका मोलाची असते कारण बडगे हे देशातील विघातक गोष्टींचा निषेध नोंदविनारे असतात.यावर्षी मिरवणुकीत आपल्याला अनेक बडगे पहायला मिळेल यात महागाई, सिलेंडरची दरवाढ, पेट्रोल दरवाढ, शहरातील खड्डे,पाकिस्तान, चीन, आतंवाद, घोटाळेबाज,भ्रष्टाचारी, करोना व्हायरस इत्यादींसह शंभरहून अधिक बडगे यावर्षी आपल्याला पहायला मिळु शकते.मारबत उत्सवाची सुरूवात नागपूर मधुन झाली.परंतु आता मारबत उत्सव महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात साजरा केल्या जातो.आज मारबत उत्सवाच्या निमित्ताने देशात होणारे अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्यां, महागाई,वाढता भ्रष्टाचार यांचा विरोधात समाजाने एकत्रित येण्याच्या उद्देशाने देशातील अनेक राज्यांनी नागपुरची परंपरा अंगीकारून समाजात सर्वसामान्यांवर होणारा अत्याचार देशातील130 कोटी जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहावा या उद्देशाने मारबत उत्सवाच्या दिवशी प्रतिकात्मक पुतळ्याचे बडगे काढून विरोध प्रगट केल्या जातो.यामुळे सुध्दा समाजात जनजागृती होतांना आपण पहातो. देशातील भ्रष्टाचाऱ्यांनी देशाला इतके पोखरून टाकले आहे की यांच्यामुळे देशात महागाईचा डोंगर उभा झाला आहे.याचे प्रायश्चित्त देशातील 130 कोटी जनता भोगत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे व गरीबांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना सर्वप्रथम घेऊन जा गे मारबत.                                                           


लेखक रमेश कृष्णराव लांजेवार

(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)

मो.नं.9921690779, नागपूर.


Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.