Header Ads

मोरगावातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकात असंतोष


कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगांव येथील बहुतांशी प्रमुख रस्ते अजूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र गेल्या कित्येक वर्षांपासून दिसत आहे.गावातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून ग्रामपंचायत,बांधकाम विभाग यांच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.कुठे खड्डे चुकवताना तर कुठे खड्यातून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या खड्डेमय कच्च्या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.खड्डे चुकवताना संतलून बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. 

             
गावातील जगताप,पवार आणि वावरे वस्तीकडे जाणारा रस्ता असेल,ग्रामपंचायती समोरून शिर्के वस्तीकडे जाणारा रस्ता असेल किंवा शाळेपाठीमागे काशीद वस्तीकडे जाणारा रस्ता असेल हे सर्व कच्चे रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.रस्ता मुरूम आणि माती टाकून केलेला असल्याने पावसात पाणी साचून निसरट होत आहे,रस्त्यावर खड्डे पडत आहेत,खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.दुष्काळात तेरावा महिना म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्यातच पाणी योजनेअंतर्गत रस्त्याच्या कडेने पाइपलाइन करण्यासाठी चरी काढण्याचे काम चालू असल्याने रस्त्यांची खूपच दयनीय अवस्था झाली आहे.
              

परिणामी या मुरुमाच्या रस्त्यांची दुरुस्ती,डांबरीकरण असेल,खडीकरण कोणी करावे,कधी निधी मंजूर होणार,कधी कामास प्रारंभ होणार,निधी येऊनही काम होत नसतील तर कोणाची जबाबदारी म्हणायची,गावातील रस्ते डांबरीकरण होणार का,हे प्रश्न मोरगाव मधील सामान्य जनतेला पडले आहेत.तातडीने हे रस्ते दुरुस्ती करावेत अशी मागणी होत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.