Header Ads

महालसीकरण 1 लाख 46 हजार लाभार्थ्यांनी घेतला लाभ

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोविड-19 लसीकरण मोहिम सुरू असून बुधवार, दि. 15 सप्टेंबर 2021 या दिवशी दीड लाख लाभार्थ्यांसाठी कोविड-19 महालसीकरण अभियान दिवस राबविण्यात आला. महालसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 46 हजार लाभार्थ्यांनी कोविड महालसीकरण मोहिमेचा कोविड लस घेवून लाभ घेतला. त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व सहभागी विभाग व लाभार्थी यांचे जिल्हा प्रशासनामार्फत अभिनंदन करण्यात येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी एकही कोविड लसीचा डोस न घेतलेल्या सर्व जनतेने लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि आपले व कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

            या मोहिमेत कोविड-19 लसीकरणाचा एकही डोस न घेतलेल्या व पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याकरिता जिल्ह्यामध्ये एकूण 594 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला बाल कल्याण विभाग इत्यादी विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागाचे नियोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागाने आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आणि अंगणवाडी विभागाने त्यांच्या बालकांच्या पालकांच्या लसीकरणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. ग्रामपंचायत विभागाने गावपातळीवर प्रचार व प्रसिध्दी, मनुष्यबळाची उपलब्धता, वाहतुकीची व्यवस्था इत्यादीव्दारे महत्वाचे योगदान दिले.

            जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व स्तरावर सक्रीय सहभाग नोंदवून लाभार्थ्यांच्या लसीकरणामध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडून उत्तम प्रतिसाद दिला आहे.

           


Blogger द्वारे प्रायोजित.