Header Ads

जत-आटपाडी राज्यमार्ग करा | आमदार विक्रमसिंह सांवत यांची मागणी

जत,संकेत टाइम्स : जत-आटपाडी राज्यमार्ग मंजूर करावा,अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या देशात व राज्यात प्रत्येक जिल्हा व तालुका हा राष्ट्रीय अथवा राज्यमार्गाने जोडलेला आहे,पण अजूनही सांगली जिल्ह्यातील जत-आटपाडी दोन तालुके कोणत्याही जलदगती मार्गाने जोडलेले नाहीत.



या भागात दळणवळणाचा अभाव असल्याने हा भाग अजुनही विकासापासून वंचितच राहिला आहे.सध्याच्या स्थितीत जत-आटपाडी रस्ता पैंकी जत-शेगाव एन एच.965 जो राष्ट्रीय महामार्ग आणि कोळा-आटपाडी हा राज्यमार्ग असल्याने केवळ शेगाव ते कोळा या जिल्हा मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा मिळाल्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जत,आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील दळणवळण वाढून या भागातील गावांचे अर्थकारणास चालना मिळू शकते.


जत रोड स्टेशन बरोबरच म्हसवड,दहिवडी.खटाव,शिखर शिंगणापूर या सातारा जिल्ल्यातील माण भाग जत-आटपाडी राज्यमार्गाने जोडला जाईल. जत तालुक्यात ब्रिटीश काळापासून चालू असलेल्या मिरज-लातूर या ब्रॉडगेज विद्युत रेल्वे लाईनवर दोन रेल्वे स्टेशन होती.




त्यातील गुळवंची हे रेल्वे स्टेशन रोड कनेटव्हीटीमुळे बंद पडले असून जत रोड हे एकमेव रेल्वे स्टेशन जत तालुक्यात आहे आणि शेजारी आटपाडी तालुक्यातही रेल्वे स्टेशन नसल्यामुळे या रेल्वे स्टेशनला अत्यंत महत्त्व आहे.



आसपासच्या सांवतवाडी रोड, इंडी रोड आणि अक्कलकोट अशी कित्येक तालुक्याची रेल्वे स्टेशन ही त्या तालुक्याच्या शहरापासून लांब अंतरावर आहेत,पण तिथे येण्या जाण्याच्या सोयी फार चांगल्या आहेत कारण ही सर्व रेल्वे स्टेशन राज्य मार्गावर आहेत.म्हणून जत आणि आटपाडी शहराला रेल्वे स्टेशनला जोडण्यासाठी जत रोड रेल्वे स्टेशन जत-आटपाडी राज्यमार्गावर आणणे गरजेचे आहे,असे शेवटी म्हटले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.