Header Ads

उघडे फ्यूज बॉक्‍स साक्षात मुत्यूचे सापळे | जीव गेल्यावर महावितरण जागे होणार काय ?

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील अनेक गावातील शिवारात महावितरणच़्या उघड्या डिपी कललेले खांब व लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना अनेकदा कळवूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी संतापले आहेत.नुकतेच बेवनूर येथे अशाच उघड्या‌ डिपीमुळे ठिनग्या पडून सुमारे 70 एकर जमिनीवरील बोअरवेल्स,वृक्ष, पिके,गवत जळाली आहेत.



जत तालुक्यातील महावितरणची  विद्युत वितरण व्यवस्था अनेक वर्षांची जुनाट आहे. वारे, पाऊस यामुळे शेतातील अनेक खांब कललेले आहेत. तर काही खांब पडण्याच्या मार्गावर आहेत. खांबांची संख्या कमी करण्यासाठी दोन खांबांमधील अंतर जादा ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वीज वाहक तारा हाताच्या उंचीपर्यंत येऊन लोंबकळत आहेत. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू तसेच ऊस व अन्य बागायती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. 




आठवड्यातील चार दिवस रात्रीच्या वेळी तर तीन दिवस उजेडी थ्री फेज वीज पुरवली जात आहे. एका डिपीवर अनेक वीज कनेक्‍शन असल्यामुळे दिवसा बहुतांश शेतीपंप सुरू केल्याने लोड वाढून वीज पुरवठा ट्रिप होतो. त्यामुळे सध्या रात्रीच पिकांना पाणी देण्यावर भर आहे. अशा वेळी या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. पायाखाली पाणी आणि डोक्‍यावर तारा असल्याने शॉक लागला तर जीव वाचू शकत नाही, अशी स्थिती आहे. 



तर अनेक डिपी सताड उघड्या असतात. त्यामुळे धोका आहे. विज सतत बंद पडत असल्याने अनेक शेतकरी डिपीच्या विज पुरवठ्याची दुरूस्थी करतात. त्यामुळे धोका कायम आहे. 




वसुलीत गुंतले कर्मचारी...
वीज बिल थकबाकीचे कारण सांगून समस्येकडे दुर्लक्ष करणारे कर्मचारी कनेक्‍शन तोडण्यासाठी मात्र धाव घेतात. सुरळीत वीज पुरवठा करण्याऐवजी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वसुली करण्यात गुंतले आहेत. दोन वर्षांपूर्वी मागणी करूनही कनेक्‍शन दिले जात नाही. उलट नादुरुस्त डिपी, उघडे फ्यूज बॉक्‍स, तुटलेले फ्यूज यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असून तातडीने दुरूस्ती न केल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.



बेवनूर ता.जत येथील उघडे फ्यूज बॉक्‍सची अवस्था कधी कुणाचा जीव घेईल,अशी झाली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.