Header Ads

पुन्हा लॉक डाऊन नको असेल तर स्वयंशिस्त पाळा

युरोप अमेरिकेसह संपूर्ण जगात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातही दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली, अहमदाबाद, हरियाणा, केरळ येथे तिचे आगमनही झाले आहे. दिल्लीत दुसरी लाट थैमान घालीत आहे. दिल्लीत  दररोज  आठ ते दहा हजार लोक कोरोनाबाधित होत आहेत तर कोरोनाने मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे त्यामुळे दिल्लीत मिनी लॉकडाऊनची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्रसरकारकडे केली आहे. महाराष्ट्रातही दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. महाराष्ट्रात दररोज पाच हजार रुग्ण सापडत आहेत. दिवाळी आधी हेच प्रमाण दीड ते दोन हजार इतके होते. कोरोना गेला अशी लोकांची मानसिकता झाली असतानाच कोरोनाने पुन्हा जोरदार एन्ट्री मारली आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता महाराष्ट्रात पुन्हा लॉक डाऊन होईल की काय अशी भीती नागरिक व्यक्त करू लागले आहेत. लॉक डाऊनचा भयानक अनुभव देशातील नागरिकांनी याआधी घेतला आहे.








 लॉक डाऊनमुळे लाखो तरुणांचा रोजगार बुडाला. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. देशातील लाखो कुटुंबाचे स्थलांतर झाले. अनेकांचा संसार उघड्यावर आला. लॉक डाऊनमध्ये आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यात आपण सक्षम नाहीत या भावनेतून काहींनी आत्महत्या केली. सर्वात महत्वाचे म्हणजे लॉक डाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली त्यामुळे पुन्हा लॉक डाऊन नको अशीच  सर्वसामान्यांची भावना  आहे. अर्थात पुन्हा लॉक डाऊन होणे - न होणे हे नागरिकांच्याच हातात आहे. नागरिकांनी जर स्वयंशिस्त पाळली नाही तर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होईल  परिणामी सरकारला नाईलाजाने लॉक डाऊनसारखी  कठोर पावले उचलावी लागतील ती होऊ द्यायची नसतील तर  नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. नागरिकांनी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे.  सॅनिटायजर, मास्क आणि सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचे कटाक्षाने पालन करणे. घरातील लहान मुले व वृद्धांची काळजी घेणे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार व दररोज व्यायाम करणे. किरकोळ आजार असेल तरी तो अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांना दाखवणे या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी जरी नागरिकांनी  केल्या तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस आपण थोपवू शकतो. मीच माझा रक्षक, आपली सुरक्षा आपल्याच हाती, माझे कुटुंब माझी जबाबदारी हे नागरिकांनी विसरता कामा नये. छोटीशी चूकही मोठया संकटाला आमंत्रण देणारी ठरू शकते याचे भान नागरिकांनी  ठेवायला हवे.









नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केल्यास सरकारवर लॉक डाऊन सारखा कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही.पुन्हा लॉक डाऊन होऊ द्यायचे नसेल तर नागरिकांना स्वयंशिस्त पाळावीच लागेल.  पुन्हा लॉक डाऊन होऊ द्यायचे की नाही हे आता सर्वस्वी नागरिकांच्याच हातात आहे. 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 
९९२२५४६२९५
Blogger द्वारे प्रायोजित.