Header Ads

मांगलेच्या चोरीचा तत्काळ छडा,चोरटा ताब्यात

शिराळा : मांगले(जि.सांगली) येथील डॉ.बी. एन.पाटील यांचा गंधा नर्सिंग होम हा घरवजा दवाखाना फोडून लॉकरमधील 29 तोळे सोने, दहा भार चांदी व रोख 50 हजार रूपये असा साडे सात लाखाच्या ऐवजावर डल्ला मारणा-या गावातीलच सराईत चोरट्यास शिराळा पोलिसांनी अटक केली. राहुल उत्तम देवकर (वय 24, रा.मांगले, ता. शिराळा) असे त्याचे नाव आहे. देवकर हा सराईत चोरटा असून त्याच्यावर कोडोली, हातकणंगले पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तब्येत बरी नसल्यामुळे मंगळवारी रात्री डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात गेला होता, मात्र दवाखान्याला कुलूप असल्याची संधी साधत त्याने दागिने व रोकड यावर डल्ला मारल्याचे तपासात पुढे आले. 






पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मांगले येथे डॉ. पाटील यांचे गंधा नर्सिंग होम आहे. ते 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता कुटुंबासह कराड येथे वास्तुशांतीच्या कार्यक्रमास गेले होते. त्यानंतर राहुल देवकर हा सराईत चोरटा मंगळवारी उपचारासाठी दवाखान्यात गेला. तेव्हा दवाखाना बंद असल्याचे पाहून त्याला चोरीची संधी मिळाली. त्याने मागील बाजूला जाऊन पाहणी करून घरवजा दवाखाना फोडला. घरातील सोन्याचांदीचे दागिने, देवाची भांडी व रोख 50 हजार रूपये घेऊन अंधारात त्याने पलायन केले. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पाटील यांनी शिराळा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. 



Blogger द्वारे प्रायोजित.