Header Ads

धनगर आरक्षणप्रश्नी उद्धव ठाकरे सरकारला शून्य गुण ; विक्रम ढोणे | वर्षभरात समाजाचा भ्रमनिरास केला; धनगर विवेक जागृती अभियानाची टीका

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वर्षभरात धनगर आरक्षणप्रश्नी कवडीचेही प्रयत्न केले नाहीत. या सरकारला याप्रश्नी शून्य गुण आहेत. सरकारने वर्षभरात धनगर समाजाचा पुरता भ्रमनिरास केला आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त अभियानाची भुमिका मांडताना ढोणे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापुर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी किमान समान कार्यक्रम घोषित केला होता, त्यात धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न होता. मात्र वर्षभरात हा प्रश्न सोडविण्यासंदर्भात सरकारने एकही पाऊल टाकलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर विधीमंडळात आणि बैठकांतही धनगर आरक्षणप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले, बेलभंडार उधळणार अशी लोकप्रिय वक्तव्ये केली, पण प्रत्यक्षात समाजाच्या तोंडी पाने पुसण्याचे काम त्यांनी केले. उद्धव ठाकरे हे सात वर्षापासून धनगर समाजाला आश्वासन देत आहेत. 2014 ला ते भाजपबरोबर होते, 5 वर्षे सत्तेत होते. त्यावेळीही पक्षाच्या मेळाव्यात धनगर समाजाला आरक्षण देणार असे सांगत होते, मात्र  त्यांनी काही केले नाही. आता वर्षभर मुख्यमंत्री होवूनही ते काही करू शकले नाहीत. ते साधी आरक्षणप्रश्नी मंत्री समितीही स्थापू शकले नाहीत, हे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षात असताना वेळोवेळी डोक्यावर पिवळे फेटे बांधून खांद्यावर घोंगडी घेतली. मात्र सत्तेवर येताच याप्रश्नाकडे दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे या सरकारवर धनगर समाज नाराज आहे.एकीकडे ठाकरे सरकार सौम्यपणे धनगर समाजाला संभ्रमित करत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फसवणुकीचा अतिरेक केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे जाहीर केले होते, मात्र पाच वर्षे त्यांची ती कॅबिनेटच झाली नाही. त्यांनी दलाल उभे करून समाजाला फसवले, आता चंद्रकांत पाटील साफ खोटी माहिती देवून धनगर मतदारांना लुभावण्याचे काम करत आहेत. 


सद्या सुरू असलेल्या पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने चार दिवसांपुर्वी पुण्यात भाजप ओबीसी सेलचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणावर भाष्य केले. मूळ एसटी हे ए ग्रुपमध्ये तर धनगर बी ग्रुपमध्ये टाकून फडणवणीसांनी सर्वांची व्यवस्था केली होती, असे चंद्रकांत पाटील यांनी तिथे सांगितले. फडणवीसांनी अशी विभागणी करून आरक्षण दिल्याचे कोणालाच माहिती नाही. मात्र धनगर समाज जागृत नसल्याने पाटील कमालीचे खोटे बोलण्याचे धाडस करीत आहेत. ठाकरे सरकारने चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणीही ढोणे यांनी केली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.