Header Ads

विशेष | निघोजचे नैसर्गिक रांजणखळगे


निसर्ग हा एक अद्भभूत चमत्कार आहे. निसर्गापुढे मानवी शक्ती अपुरीच पडते. जगातील जी आश्चर्य आहेत त्याला निसर्गाची देण लाभलेली आहे.म्हणूनच ती अद्भभूत आहेत.मानवाच्या प्रत्येक अपेक्षा परिपूर्ण करण्याचा निसर्गाने प्रयत्न केला आहे. त्यातीलच रांजणखळगे हा निसर्गाचा चमत्कार आज आपण जाणून घेऊया. पाण्याच्या प्रवाहाने ओढे, नद्या तयार होतात.मात्र या वाहत्या पाण्यात भोवरा व खाली खडक असल्यास खळगे पडण्याचा 'चमत्कार' घडून येतो. असा चमत्कार घडण्यासाठी जी परिस्थिती तयार व्हावी लागते;ती परिस्थिती पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील निघोज या गावाजवळील कुकडी नदीच्या पात्रात घडली आहे.नदीच्या पात्रातील खळगे खूप खोल आणि रांजणाच्या आकाराचे असल्याने यास 'रांजणखळगे ' असे नाव पडले आहे.
हा विज्ञान आणि निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. रांजणखळगे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खळगी आहे. कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आणि व्हेक्युलर बेसॉल्ट यांचे थर एकाआड एक दिसतात. नदी प्रवाहाने ते कापले गेल्यामुळे नीट दिसतात. पाण्याच्या प्रवाहात लहान-मोठे भोवरे तयार होतात. या भोवऱ्यामध्ये छोटे-मोठे गोटे अडकून फिरू लागतात. नदी पात्रातील दगडावर घर्षण प्रक्रिया सुरू होते .या गोट्यांना ' टूल्स' असं म्हणतात. भोवऱ्यात अडकून सतत गोल गोल फिरल्याने वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच खड्डे मोठे झाले की त्यांना रांजणाचा आकार प्राप्त होतो. भू शास्त्रीय परिभाषेत 'पॉट होल्स' या संज्ञेने हे ओळखले जातात.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे  'पॉट होल्स 'आहेत पण निघोजसारखे' पॉट होल्स' इतरत्र नाहीत.कुकडी नदीच्या पात्रात अर्धा किलोमीटरच्या परिसरात निसर्गाचा हा चमत्कार अनुभवास येतो. पावसाळ्यात हे खळगे धबधब्याचे रूप धारण करतात. आपण पावसाळ्याच्या नंतर गेलो तेव्हा आपणास या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येऊ शकतो.खळगे आणि नदीचे पात्र पाहण्यासाठी नदीवर झुलता पूल बनवला आहे. त्यावर आपण उभे राहून हे विहंगम दृश्य अनुभवू शकतो. काही रांजणखळगे जवळ जवळ आहेत त्यामुळे त्यांच्या भिंती किंवा कडा एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. काही रांजणखळगे वर-खाली असे तयार झाले आहेत. तेही एकमेकांना जोडले आहेत. आपण उन्हाळ्यात येथे भटकंती केलो तर सर्व रांजणखळगे चांगले पाहू शकतो. जवळच मळगंगा देवी व कोतुळेश्वर मंदिराचा नयनरम्य परिसर पाहण्यासारखा आहे.


कांबळे चंद्रकांत हरीबा,उमरगा
7038269331

Blogger द्वारे प्रायोजित.