Header Ads

ड्रग्जमुळे बॉलिवूड बदनाम   

               

 

 


 

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपासातून रोज नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपासला आता नवेच वळण लागले असून या तपासातून  बॉलिवूड आणि ड्रग्ज असे नवेच कनेक्शन आता पुढे येत आहे. यातूनच नॅशनल नार्कोटिक्स एजेंसी ( एन सी बी ) ने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर तसेच सारा अली खान या  बॉलिवूडच्या आघाडीच्या तारकांची कसून चौकशी केली. तसेच बॉलिवूड मधील बड्या सिताऱ्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या काही ड्रग्ज पेडलरला अटक झाली.

 


 

भविष्यात आणखी काही तारे तारकांची चौकशी होऊन त्यातून अनेक धक्कादायक रहस्य बाहेर येण्याची शक्यता आहे. बॉलिवूड मधील तब्बल 25 सिलिब्रेटी पोलिसांच्या रडारवर आहेत.  हे सर्व प्रकरण एखाद्या गूढ, रहस्यमय चित्रपटाची पटकथा असल्याप्रमाणे समोर येत आहे पण यातून बॉलिवूडची  नाचक्की होत आहे  हे मात्र नक्की. या निमित्ताने चंदेरी दुनियेची काळी बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे. जे तारे तारका पडद्यावर आदर्शवादी नायक, नायिकांची भूमिका रंगवत असतात त्यांचे वास्तविक जीवन नेमके त्याच्या उलट असते हे या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आले. हेच का ते आदर्शवादी नायक, नायिका असा प्रश्न आता प्रेक्षक विचारू लागले आहेत. सुशांतसिंग राजपूत फिल्मी पार्टीमध्ये ड्रग्ज घेत होता ही माहिती पुढे आल्यानंतर त्याच्या  आत्महत्येनंतर त्याच्याविषयी निर्माण झालेली  सहानुभूतीही आता कमी होऊ लागली आहे. या प्रकरणाला कायदेशीर पैलू तर आहेच पण नैतिक पैलू देखील आहेत. कोट्यवधी रुपये कमावूनही या लोकांकडे  कोणताही सिद्धांत आणि कोणतेही जीवनमूल्ये नाही. अर्थात बॉलिवूडला धूम्रपान, मद्यपान, लेट नाईट पार्टी या गोष्टी नव्या नाहीत. पूर्वीपासून यागोष्टी बॉलिवूडमध्ये चालत आल्या आहेत. मीनाकुमारी सारखी प्रतिभाशाली अभिनेत्री अतिमद्यपान केल्यानेच देवाघरी गेली. राजकपूर सारखा शोमन, राजेश खन्ना सारखा सुपरस्टार हे देखील त्यांच्या मद्यपणासाठी प्रसिद्ध होते. जुन्या जमान्यातील मोतीलाल, के एल सैगल हे देखील यांचे  देखील याबाबत नावे घेतली जातात. धूम्रपान न करणारे नायक, नायिका तर बॉलिवूडमध्ये शोधूनही सापडणार नाही अर्थात अमिताभ बच्चन सारखे काही सन्माननीय अभिनेते याला अपवाद आहेत पण त्यांची संख्या फारफार तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असेल. पूर्वी धूम्रपान, मद्यपानापुरते  मर्यादित असलेल्या  बॉलिवूडमध्ये आता ड्रग्जचे पर्व सुरू झाले आहे. फिरोज खानचा मुलगा फरदिन खानला ड्रग्ज बाळगल्यामुळे दुबईत अटक करण्यात आली होती. त्याचे करियरही ड्रग्जमुळेच संपले.  संजय दत्त अगदी तरुण वयात ड्रग्जच्या आहारी गेला पण वडील सुनील दत्त यांनी त्याला वेळीच सावरल्याने तो त्यातून बाहेर आला. ममता कुलकर्णी आणि तिचा नवरा ड्रग्ज पेडलर आहेत. केनिया, टांझानिया या आफ्रिकन देशात ते ड्रग्ज विकतात अशी माहिती मध्यंतरी पोलीस तपासातून उघड झाली होती.  ते दोघेही मुंबई पोलिसांच्या वांटेड लिस्टमध्ये आहेत. ड्रग्जमुळे बॉलिवूड पुरती बदनाम झाली आहे. या तपासातून पुढे जे धक्कादायक खुलासे समोर येणार आहेत त्यातून बॉलिवूडची आणखी बदनामी होणार आहे.  चित्रपट तारे, तारकांच्या विषयी प्रेक्षकांच्या मनात जी आपुलकीची, प्रेमाची भावना होती तिला तडे जाऊ लागले आहे. बॉलिवूडची प्रतिमा काळवंडू लागली आहे अर्थात याला सर्वस्वी  ड्रग्जच्या आहारी गेलेले हेच नशिले कलाकार जबाबदार आहेत.

 

 श्याम बसप्पा ठाणेदार दौंड

 जिल्हा पुणे 9922546295 


 

 


 

 


   ReplyForwardBlogger द्वारे प्रायोजित.