Header Ads

जत तालुक्यातील 11 गावांमध्ये जनावरांत लम्पी स्कीन डिसीजचा(एलएसडी) प्रादुर्भाव


 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 11 गावांमध्ये जनावरांत लम्पी स्कीन डिसीजचा(एलएसडी) प्रादुर्भाव झाला आहे.शेतकऱ्यांना हा रोग नवीन असल्याने माहिती नाही.दुभती जनावरे संकटात सापडली आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने इतरत्र वेगाने फैलाव होणार आहे.पशुसंवर्धन विभागाकडे संख्याबळ कमी असल्याने दुर्लक्ष होत आहे.

 

त्यामुळे पशुधन संकटात सापडले आहे.तालुक्यामध्ये एकूण जनावरांची संख्या 5 लाख 59 हजार 101 आहे.त्यामध्ये गाय 88 हजार 22, म्हैस 62 हजार 200, शेळ्या 1 लाख 1 हजार 430, मेंढ्या 56 हजार 259, कोंबड्या 2 लाख 51 हजार 190 आहेत.अचकनहळ्ळी, डफळापूर,बनाळी, आवंढी, शेगाव, रामपूर,करजगी, बोर्गी, बालगाव, हळ्ळी,उमदी या गावांमध्ये पशुधनामध्ये लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव झाला आहे.

 

उमदी येथील शेतकऱ्याच्या बैलाच्या अंगावर गाठी उठल्या आहेत. पाय सुजला आहे.ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे आदी सुरुवातीची लक्षणे दिसत आहेत.हा विषाणूजन्य आजार आहे.कँप्रिपोक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने गाय,बैल, म्हैस,वासरांना होणारा रोग आहे.देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार कीटक, डास,चावणाऱ्या माशा, गोचिड आदींमार्फत होतो. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो.उष्ण व आर्द्रता हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो आहे. तरीही याकडे पशुसंवर्धन विभागाचे लक्ष नाही.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.