जतेत तापमान @40 अंशावर | घरात बसला की उकाडा ; बाहेर गेले की कोरोना..!,नागरिक हैराण |
जत,प्रतिनिधी : सद्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची दहशत आहे. प्रत्येक नागरिकांना खबरदारी म्हणून घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यातच दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला असून घामाच्या धारा वाहु लागल्या आहेत.दिवसभर अंगाची काहिली वाढत असून कोरोनामुळे थंडपेया पासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर सायंकाळ झाली की जत तालुक्यात दर चार-आठ
दिवसानंतर वादळी वाऱ्यासह आभाळ उठत आहे. यामुळे आधीच कोरोनामुळे
धास्तावलेल्या नागरिकांना निसर्ग पुन्हा दहशतीत आणत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मे महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असून, जत तालुक्यात उन्हाची काहिली वाढली आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. सध्या कमाल तपमान 39 ते 41 अंश सेल्सियवर पोहोचले आहे. पंधरा दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण आणि कडक ऊन पडल्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. सकाळी नऊ वाजताच उन्हाची दाहकता जाणवू लागली आहे.
आठ दिवसांपूर्वी जत पूर्वभागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले आहे. दमट वातावरणामुळे हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे नागरिक घरात थांबून आहेत. परिणामी घरातील पंखे, एसीचा वापर वाढला आहे. शिवाय फ्रीज आणि माठातील पाण्याचा वापर वाढला आहे. शरीराला थंडावा मिळण्यासाठी लिंबू सरबतचे सेवन केले जात आहे.
तालुक्यात दुष्काळाच्या वणव्यात उन्हाची भर पडली असून सर्वसामान्य शेतकरी वर्गही त्रस्त आहेत. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शेतीच्या कामात खंड पडत आहे. गतवर्षी जत तालुक्याच्या मध्यभागात म्हणजेच माडग्याळ, संख,मुचंडी मंडळात पाऊस जेमतेम झाला आहे. सद्या ऐन उन्हाळ्यात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सोन्याळ, अंकलगी,गोंधळेवाडी या गावांना शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. अल्प पाऊस आणि उन्हाचा वाढता तडाख्याने फेब्रुवारीतच पाणीपातळी खालावण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने उष्णता अधिक जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यात एप्रिलच्या दुसर्या आणि तिसऱ्या आठवड्यात झालेल्या अवकाळी वारे व पावसामुळे उष्णतेच्या प्रमाणात काही उतार जाणवला परंतु लगेचच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली.आज अखेर हे तापमान अधिकच वाढत जात असल्याचे चित्र आहे.