Header Ads

जत | लॉकडाऊनमुळे हातभट्टीला अच्छे दिन ! | पुर्व भागात महापूर : उत्पादन शुल्कचे हाताची घडी तोंडावर बोट,पोलीसांना मर्यादा |


 


जत,प्रतिनिधी : संपूर्ण भारत देशात कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र जत तालुक्याच्या ग्रामीण भागात याचा काहीही एक फरक पडलेला दिसून येत नाही. जिल्हा लॉकडाउनचा फायदा घेत  ग्रामीण भागात अवैध हातभट्टी दारु मोठ्या प्रमाणावर गाळले जात आहे. तयार झाल्यावर 100 मिलिची दारूची पाकिटे करून विक्री केली जात आहे.ही धंदे माडग्याळ,उमदी व संख सर्कलमध्ये बिनबोभाट राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

 

यासाठी तांडा,वाड्या वस्तीत व आसपासच्या निर्जनस्थळी  दारू गाळली जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर आले आहे. लॉकडाउनमुळे सर्वत्र देशी-विदेशी दारू बंद असल्याने रोज पिणाऱ्या तळीरामांचा मोर्चा हा गावठी दारूकडे वळला असून  ग्रामीण भागात अवैध गावठी दारूवाले जास्त फोफावल्याचे चित्र दिसत आहे.तालुक्याच्या विशेषतः पूर्वभागात काही तांंडे आणि वाड्यावस्त्यावर पारंपरिक पद्धतीने हातभट्टी काढली जाते.हाताने काढलेल्या दारूला गावठी दारूसुद्धा म्हंटले जाते.

 

या दारूच्या उत्पादनांसाठी डोंगर किंवा निर्जनस्थळाचा वापर केला जात आहे. ही दारू बनवण्यासाठी काळा गुळ विशिष्ट जातीच्या झाडाची साली, नवसागर आदी साहित्य घालून ती काही दिवस कुजवली जाते मग त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उकळवून दारू गाळली जाते.यात आता बदल करण्यात आले आहे.तसेच यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर केला जातो. ग्रामीण भागात याप्रकारे सर्रास गावठी दारुची उत्पादन आणि विक्री होत असते.सांगली जिल्हा उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस यंत्रणा मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे  नागरिकांतून बोलले जात आहे.

 

गावठी दारु ही आतिशय घातक असुन सुरवातीला दारू तयार करण्यासाठी नवसागर काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. परंतु सध्या दारू तयार करण्यासाठी घातक रसायने,रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे.तसेच गावठी दारू तयार केल्यानंतर सांडपाणी किंवा रसायन त्याच ठिकाणी उघड्यावर सोडून दिले जात आहे.

 

त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. शिवाय हातभट्टी लावण्यासाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने वनसपंदा अडचणीत येत आहे. त्यामुळे वनविभागानेही आता अवैध दारू करणाऱ्यांविरोधात पुढे येणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागकडून या बेकायदेशीर दारू विरोधात केसेस केल्या जात असल्या तरी तुलनेने नाममात्र आणि जुजबी आहेत.

 

त्यामुळे अवैध दारूची निर्मिती बंद झालेली नाही.त्यांची जरब किंवा धाक यांच्यावर नसल्याने हा धंदा राजरोस सुरू आहे.उत्पादन आणि विक्री या दोन्ही कारवाईचा तुलनात्मक अभ्यास केला तर दारू भट्यांच्या मालकावर कारवाईपेक्षा  विक्री करणाऱ्यांवर कारवाई जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत अशी अवैध दारू निर्मितीची केंद्र उद्ध्वस्त होणार नाही तोवर हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. असे मत सामान्य लोक व्यक्त करत आहेत.

 

सातत्याने कारवाईच पर्याय

 

जत तालुक्यातील विविध तांडा आणि वस्त्यांवर ही घातक विषारी दारू तयार करणे तसेच विकणे यासाठी प्रसिद्ध आहेत. या लॉकडाऊनमुळे हातभट्टी व्यवसायाला कधी नव्हे तेव्हढे अच्छे दिन आले आहेत.प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे. हा विषारी दारू तयार करणे  हा सर्वात मोठा गुन्हा असून आय पी सी कलम 328 अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही केल्यास हातभट्टी सारख्या विषारी दारू तयार करण्यावर व विक्रीवर आळा बसेल. परंतु  उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभाग या दोन्ही खात्यातील कर्मचाऱ्याशी आर्थिक व मधुरसंबध या हातभट्टी दारू बनविणाऱ्या व विक्रेत्यांसी असल्यामुळे कोणतीही कार्यवाही होत नाही झाली तरी जुजबी आणि नाममात्र कारवाई झाल्याचे चित्र पहायला आणि अनुभवयला मिळत आहे. तरी सांगली जिल्ह्यातील  वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन विषारी दारू विक्रेत्यावर कारवाई करावी, मुळासकट दारू निर्मिती केंद्र नष्ट करण्यात यावे व जनतेचे जीवन वाचवावे अशी मागणी जत ग्रामीण भागातुन होत आहे.


 

 

जत पुर्व भागातील गावात हातभट्टी दारूची पडलेली मोकळी पाकिटे सर्व चित्र स्पष्ट करतात.

 
 


Blogger द्वारे प्रायोजित.