Header Ads

अप्प दीपो भव!.. दीप्रज्वलन.. कोरोना मुक्तीच्या लढ्यासाठी एक सोपा मार्ग | डॉ. राजेंद्र आनंदा लवटे यांचा विशेष लेख


दु:खापासून मुक्ती आणि सुखसमाधानाचा शोध यासाठी माणूस आयुष्यभर धडपडत असतो. त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला 'अप्प दीपो भव' हा मार्ग कोरोनाच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. आणि त्यासाठीच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि.5 एप्रिल, 2020 रोजी रात्री 9 वा सर्व भारतीयांना 9 मिनिटं अंगणात दीप्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करायला सांगितले आहे त्या निमित्ताने.. 


तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांना प्रिय शिष्य आनंद याने विचारले, जेव्हा तुम्ही किंवा तुमच्यासारखा कोणी सत्याचा मार्ग दाखवायला पृथ्वीवर नसेल तेव्हा आपण आपल्या जीवनाला कसे दिशा देऊ शकतो?. तेव्हा भगवान बुद्धांनी हे उत्तर दिले - “अप्प दीपो भव”. अर्थात दुस-याची अपेक्षा करण्याऐवजी आपणच आपला स्वतःचा दिवा बनून स्वयंप्रकाशित (प्रेरणा) व्हा व स्वतःबरोबर इतरांसाठी, दीपगृहाप्रमाणे चमकत राहा व त्यांनाही प्रकाशित करा (प्रेरणा बना). थोडक्यात इतर कोणी नेहमीच एखाद्याला रस्त्याचा मार्ग शोधू शकत नाही, तर केवळ आत्मज्ञानाच्या प्रकाशाने आपला सत्याचा मार्ग आपणच  शोधून त्यावर पुढे जाऊ शकतो.


भगवान बुद्ध पुढे आनंदाला म्हणाले, तू मला तुझ्या आधाराच्या कुबड्या बनवू नको, आणि माझ्या आधाररुपी कुबड्या घेऊन अजून तू किती दूर चालणार आहेस? थोडे अंतर चालशील पण ध्येयापर्यंत पोहचणार नाहीस. आज मी तुझ्या सोबत आहे, उद्या मी तुझ्या सोबत कायम राहणार नाही, तेव्हा तुला स्वतःच्या पायावर चालायचे आहे. माझ्या आधाराच्या उजेडात तू चालू नकोस कारण थोड्या वेळात जंगलात दिवसभराच्या उजेडानंतर अंधार पडणार आहे तशी माझीहि तुझ्यासोबतची साथ सुटणार आहे. तू माझ्या ज्ञानरूपी प्रकाशात काही वेळ प्रकाशित होशील, पण नंतर आपले मार्ग वेगळे होतील. माझा ज्ञानप्रकाश माझ्या सोबतच राहील व तुझ्या सोबत तुझा अंधार असेल. त्यामुळे स्वतःचा आत्मज्ञानरूपी दिवा पेटवून प्रकाशमान (ज्ञानी) हो. अप्प दीपो भव!


कोरोनाच्या बाबतीत काही हिंदू धर्मांध गोमूत्र व गोमय खाण्याचा व घरगुती उपचार करण्याचा सल्ला देत आहेत. काही धर्मांध मुस्लिम तरुण अपप्रचार करत आहेत कि मुस्लिमांना कोरोना होत नाही. अल्ला आपला संरक्षक आहेत. त्यामुळे कोरोनाला न घाबरता एकत्र या, नमाज पडा, एकमेकाला आलिंगन द्या, एकमेकांचे उष्टे खा-प्या.  तसेच काही ख्रिश्चन लोक हि येशू ख्रिस्ताचा धावा केला तर त्यांना कोरोना होत नाही असे सामुदायिक प्रार्थना घेऊन सांगत आहेत. परंतु हे धर्मांध लोक धादांत खोटे बोलत आहेत. कोरोनासंदर्भात अनेक तज्ञ, प्रशासन वारंवार मार्गदर्शन करत आहेत.


कोरोनावर सध्या कोणतेही अचूक औषध नाही. कोरोनाचा प्रसार हा एकमेकांच्या संपर्कातून व खोकल्यावर बाहेर पडणाऱ्या तुषारांतून होत असल्यामुळे त्यावर सामाजिक अंतरता (सोशल डिस्टंसिंग) हा सगळ्यात सोपा उपाय आहे. त्यामुळे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २२ मार्च रोजी सुरवातीला एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करून सायंकाळी कोरोना विरोधात लढा देणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, आशा सेविका यांचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी आपापल्या अंगणात, ग्यालरीत टाळ्या, घंटानाद, व थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी सलग ३१ मार्च पर्यंत संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केली. तसेच कोरोनाचे संकट ओळखून मा. नरेंद्र मोदी यांनी दि. २५ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत सलग २१ दिवसाची संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केली आहे.


मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवार दि.5 एप्रिल,2020 रोजी रात्री 9 वा सर्व भारतीयांना 9 मिनिटं आपल्या दारात, बालकनीत किंवा टेरेस वर येऊन मेणबत्ती, पणती, मोबाईलचा टॉर्च लावावा, अशी घोषणा केली. अंगणात दीप्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करायला सांगितले आहे. त्यावर अनेक राजकीय पक्षांनी खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान कोरोना वर उपाययोजना करण्याऐवजी नको ते कार्यक्रम आयोजित करून पोरखेळ करत आहेत. फेसबुक वॉट्सप वर अनेक विनोद केले जात आहेत. यामागचा हेतू खूप चांगला आहे. महाराष्ट्रात 22 मार्च  पासून देशाच्या सर्व राज्यांमध्ये 24 मार्च पासून संचार बंदी (लॉकडाऊन) आहे. प्रत्येक जण स्वतः घरामध्ये आहेत. फक्त अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांची खरेदी करण्यासाठी साठी बाहेर पडू शकतो. 4-5 व्यक्ती पेक्षा जास्त जन एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असे वाटत आहे की, कोरोना विरुद्ध माझा एकट्याच लढा आहे का?. या लढयामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, सेस्वाभावी संस्था तसेच आपल्यासोबत आपल्या परिसरातील किती लोक आहे हे तुम्हाला समजावं व सगळ्यांच्यात सांघिक भावना निर्माण करण्यासाठी मा. पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यानिमित्ताने भारतीयांची एकीचे दर्शन जगाला होईल, परंतु यामागे एक वैज्ञानिक सत्य आहे. आग हि निर्जंतुकीकरण करण्याचे एक महत्वाचे साधन आहे.


 


निर्जंतुकीकरण व निर्जंतुकीकरनाच्या पद्धती: 


 


  शस्त्रक्रियांची उपकरणे यांचे ऑटोक्लेव्हमध्ये व नायक्रोम तारेचे ज्योतीवर निर्जंतुकीकरण करताना


 निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व सूक्ष्मजीव उदा., विषाणू, जीवाणू, आदिजीव, कवक व कवक-बीजाणू हे एकत्ररित्या अथवा एकेकटे नष्ट करण्याची कोणतीही पद्धत. सूक्ष्मजीव पृष्ठभागावर द्रवामध्ये, औषधामध्ये किंवा वृद्धिमिश्रणामध्ये असू शकतात. त्यांचे निर्जंतुकीकरण विविध पद्धतींनी करतात.अन्नपदार्थांचे निर्जंतुकीकरण व साठवण: फ्रेंच शेफ निकोलस अ‍ॅपर्ट याने अन्न जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी निर्जंतुकीकरण केले पाहिजे हे जेली, फळांचे रस व मुरंबे यांच्या काचेच्या बाटल्या उकळत्या पाण्यात बुडवून गरम असताना त्यांची तोंडे बुचाने बंद करून त्यावर गरम मेणाचा थर देऊन दाखवून दिले. सध्या अन्नप्रक्रिया उद्योगात या  पद्धतीचा व्यावसायिक उपयोग करून घेतला जातो.शस्त्रक्रियेसाठीच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरण: जोसेफ लिस्टर याने शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे निर्जंतुक करण्याची पद्धत शोधून काढल्यानंतर शस्त्रक्रियेच्या वेळी आणि नंतर संसर्ग होऊन रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय रीत्या कमी झाले.इतर गोष्टींचे निर्जंतुकीकरण: कोणतीही जखम शरीरात करावयाची असल्यास जखमेतून होणारा संसर्ग टाळण्यासाठी किंवा शरीरात जी लवण द्रावणे किंवा औषधे शिरेवाटे देण्यात येतात ती निर्जंतुक करण्यात येतात. याशिवाय पेसमेकर, कृत्रिम झडपा, अस्थिभंग झाल्यानंतर हाडे जुळविण्यासाठी वापरण्यात येणारे धातूचे भाग आणि कृत्रिम वाहिन्या स्टेंट शस्त्रक्रियेच्या वेळी शरीरात कायमचे घालण्यात येणारे भाग निर्जंतुक केलेले  असतात.निर्जंतुकीकरण आणि जंतुविरहित करणे या दोन्ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत. निर्जंतुकीकरण म्हणजे सूक्ष्मजीवांना उष्णता, रसायने आणि विकिरण पद्धतींचा सामान्यपणे वापर करून नष्ट करणे. जंतुविरहित करणे म्हणजे सूक्ष्मजीवांचे प्रमाण साबणाने अथवा जंतुनाशक (सॅनिटायझर) ने हात-पाय किंवा पूर्ण शरीर धुवून त्वचेवरील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी करणे.उष्णतेच्या वापराने सर्वाधिक निर्जंतुकीकरण करण्यात येते. उकळत्या पाण्यापेक्षा अधिक तापमानास व 1.5 वातावरणीय दाबाखाली बहुतेक जीवाणू नष्ट होतात. उष्णता वापर पद्धतींचे आता प्रमाणीकरण करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणे, बांधपट्टा (बँडेजेस्) कापूस, कपडे, हातमोजे आणि मुखाच्छादन (मास्क) ऑटोक्लेव्ह उपकरणात ठेवून निर्जंतुक केले जातात. उष्ण वाफेच्या साहाय्याने (1210-1340से.) ऑटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक करण्याच्या वस्तू कमीत कमी 15 मिनिटे ठेवतात. काही पदार्थ आणि उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी ती कापडात गुंडाळून अधिक वेळ ऑटोक्लेव्हमध्ये ठेवण्याची पद्धत आहे. आतील हवेचा दाब वाढविल्यास कमी वेळात निर्जंतुकीकरण करता येते. याला प्रेशर ऑटोक्लेव्ह म्हणतात. ऊतीसंवर्धनासाठी वापरण्यात येणारी सर्व उपकरणे व वृद्धिमिश्रणे वेगळ्या ऑटोक्लेव्हमध्ये ठेवावी लागतात. वाफेशी किंवा पाण्याशी संपर्क टाळण्यात येणाऱ्या वस्तू कोरड्या उष्णतेने निर्जंतुक करतात. सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत संवर्धन (कल्चर) अगार (Agar Agar) बशीवर अंत:क्रमित (इनॉक्युलेट) करण्यासाठी नायक्रोम तार ज्वालकामध्ये तापवून अपेक्षित संवर्धन बशीवर घेण्यात येते. त्यामुळे अनपेक्षित संवर्धनांचे मिश्रण होणे टळते. रुग्णाच्या दूषित वस्तू बांधपट्टी, शरीरातून काढलेले अवयव, सुया जाळून टाकण्याने संसर्ग टळतो. काही बीजाणूंद्वारे पुनरुत्पादन करणारे जीवाणू अतिशय चिवट व उष्णतेस दाद न देणारे आहेत. दररोज एकदा असे तीन दिवस ऑटोक्लेव्ह केल्याने ते नष्ट होतात, याला टिंडलायझेशन म्हणतात. यातसुद्धा कोरड्या उष्णतेचा वापर केला जातो.


रासायनिक निर्जंतुकीकरण: 70 टक्के पेक्षा अधिक संहत अल्कोहॉल, हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम हायपोक्लोराइट, एथिलीन डायऑक्साइड, पॅराअ‍ॅसिटिक आम्ल, ग्लुटाराल्डिहाइड अशी अनेक रसायने तंतुप्रकाशीय व इलेक्ट्रॉनीय वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येतात. अशा वस्तू उष्णतेने निकामी होण्याची शक्यता असल्याने त्या निर्जंतुक करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांची संहती व निर्जंतुकीकरणासाठी लागणारा वेळ यांच्यामध्ये बरीच विविधता आहे.शस्त्रक्रिया कक्ष नेहमी पूर्ण निर्जंतुक ठेवावे लागते. फॉर्मॅलिनचे ठराविक संहतीचे द्रावण व पोटॅशियम परमँगनेट वापरून त्याची वाफ कक्षामध्ये सोडतात. शस्त्रक्रियेआधी त्वचा आयोडीन द्रावणाने स्वच्छ करतात.


विकिरण पद्धती: या निर्जंतुकीकरण पद्धतीमध्ये अतिनील किरण, इलेक्ट्रॉन शलाका, क्ष-किरण, किंवा आणवीय कणांचा वापर आवश्यकतेनुसार करतात. यातील अतिनील किरणांमुळे आयनीकरण होत नाही. पारदर्शक वस्तू व पृष्ठभागावरील जीवाणू विशिष्ट तरंगलांबीच्या अतिनील प्रकाशामध्ये ठेवल्यास निर्जंतुक होतात. शस्त्रक्रिया कक्षातील दिवे, दंतवैद्याजवळील दिवा अतिनील किरणांमुळे पृष्ठभाग निर्जंतुक ठेवतो. जैव घटक सुरक्षित ठेवण्याकरिता काचेच्या कपाटात अतिनील प्रकाश दिवे लावून ते घटक निर्जंतुक ठेवतात. मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी अतिनील किरण शलाकेचा वापर करतात. ज्या वस्तूमधून दृश्य प्रकाश जातो अशा सर्व वस्तू अतिनील किरण प्रवेशी आहेत. ज्या ठिकाणी अतिनील किरण पोहोचत नाहीत अशा सावलीच्या ठिकाणी जीवाणू वाढतात.अंत:क्षेपण सुया, आयव्ही सेट निर्जंतुक करण्यासाठी गॅमा किरणांचा वापर करण्यात येतो. लहान रुग्णालयात सिझियम-137 गॅमा किरण स्रोताचा तर औद्योगिक निर्जंतुकीकरणासाठी कोबाल्ट-60) गॅमा किरण स्रोताचा वापर करतात. अन्न टिकविण्यासाठी त्यावर गॅमा किरणांचा ठराविक काळ मारा केल्यास ते दीर्घकाळ टिकते. औषधे, गोळ्या आणि अंत:क्षेपी द्रव निर्जंतुक करण्यासाठी अधिक खोलवर प्रवेश करणाऱ्या क्ष-किरणांचा वापर करण्यात येतो. मोठ्या सरकत्या पट्ट्यावर निर्जंतुक करण्यासाठीच्या वस्तू ठेवून त्यावर क्ष-किरण सोडले जातात. क्ष-किरण किंवा गॅमा किरणांचा मारा केलेल्या वस्तू किरणोत्सारी होत नाहीत. तसेच त्यांच्यामध्ये रासायनिक बदल होत नाही. त्या वापरासाठी सुरक्षित असतात.वरील पद्धतीने जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. जनावरांतील मॅडकाऊ आजार, मेंढ्यांमधील स्व्रेपी व मानवामधील सीजेडी (क्रुझपेल्ड जॅकोब डिसीज) आजार ‘प्रिऑन’ कारकामुळे होतो. प्रिऑन हे एक कारक प्रथिन आहे. प्रिऑन नष्ट करण्यासाठी वेगळ्या परिणामकारक पद्धती विकसित झाल्या आहेत.


 


 


 


सध्याचा कोरोना चा विषाणू नष्ट करण्यासाठी आगीतून उत्पन्न होणारी उष्णता हा एक साधा-सोपा घरगुती उपाय आहे. यासाठी एखाद्या पात्रात भीमसेनी कापूर, धूप जाळून घराच्या कानाकोपऱ्यात फिरवणे हा एक सोपा उपाय आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपोत्सव करण्याचा जो उद्देश सांगितला आहे त्याचे राजकारण न करता त्यामागील वैज्ञानिक मर्म जाणून दररोज अंगणात व घरा-दारात कापूर व धूप जाळून तसेच पणत्या पेटवून आपल्या दारातून होणारा कोरोना विषाणू व इतर सूक्ष्म जीवांचा प्रवेश परतवून लावूया. हे करत असताना उन्हाळा असल्याने चुकून आग लागून छप्पर, घर आदी आगीच्या भक्षस्थानी पडून नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.  लक्षात ठेवा ज्याने पाहिले, त्याने जाणले ने जाणले, त्याला ते गवसले


ज्याला ते गवसले, ते बदलले,


जर बदलला नाही तर समजा कि


त्याच्या जाणून घेण्यात काहीतरी खोट होती


त्याच्या ज्ञानामध्ये काहीतरी गडबड होती…


'अप्प दीपो भव' या बुद्धाच्या सूत्राप्रमाणे आत्मज्ञानाची ज्योत मनात कायम तेवत ठेवून विवेकशील व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपल्या जीवनात वैयक्तिक व सामाजिक स्वछता कायम बाळगण्याची शपथ यानिमित्ताने घेऊ. कोरोना विरोधातील लढा एकत्रितपणे लढून यशस्वी करू व भारत जगाला आदर्श ठरेल यासाठी प्रयत्नशील राहू.   


 


डॉ. राजेंद्र आनंदा लवटे


विभागप्रमुख वनस्पतीशास्त्र


राजे रामराव महाविद्यालय, जत





Blogger द्वारे प्रायोजित.