Header Ads

बिळूर | तुकाराम बाबाचे समाजसेवेत योगदान आदर्शवत ; मुरगेंद्र महास्वामीजी | बसवेश्वर जयंतीदिनी जिवनावश्यक किटचे वाटप |


 

जत,प्रतिनिधी : साधू संत येती घरा त्याच्या घरी नित्य दिवाळी,दसरा असे म्हटले जाते.पण आज कोरोनाच्या या महामारीत चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा हे स्वतः तालुक्यातील गोरगरिबांच्या घरी, झोपडीत जावून जिवनावश्यक किटचे, भाजीपाल्याचे निस्वार्थपणे वाटप करत आहेत.या कठीण काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम बाबा यांनी सुरू केलेले समाजकार्य कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन बिळूर मठाचे मठाधिपती मुरगेंद्र महास्वामीजी यांनी केले.

जत तालुक्यातील बिळूर येथे जगतज्योती श्री. बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी बिळूर येथील मुख्य चौकात सोशल डिस्टन्सचा नियम राखत गोरगरीबांना, गरजवंतांना जिवनावश्यक किटचे बिळूर मठाचे मठाधिपती मुरगेंद्र महास्वामीजी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी श्रीशैल पाटील प्रमोद कोटगोंड, गुरबसु कोटगोंड,प्रशांत टक्कोणावर,संजय कोटगोंड आदी उपस्थित होते.

मुरगेंद्र महास्वामीजी पुढे म्हणाले की, जेव्हा देशातील, राज्यातील सर्वसामान्य जनता अडीअडचणीत असते त्यावेळी त्यांच्या मदतीला,त्यांचा हाकेला ओ देण्यासाठी साधू,संत धावून येतातच. किर्तन, प्रवचन,भारुडातून जनजागृती करण्याबरोबरच भुकेलेला अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्याची या देशाची परंपरा आहे.संत गाडगेबाबा यांनी जगाला स्वच्छतेचा संदेश देत समाजातील अंधश्रद्धा दूर केली. संत बागडेबाबा यांनी दिन दुबळ्यांचे अश्रू पुसले. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांचे जत तालुक्यात निस्वार्थपणे काम सुरू आहे. 

तुकाराम बाबा यांच्या या कार्याला समाजातील दानशूर व्यक्तीने बळ द्यावे,असे आवाहनही मुरगेंद्र महास्वामीजी यांनी यावेळी केले.

 

जो भुकेला तो गरीब: तुकाराम बाबा

 

आज आपल्या खिशात पैसे आहेत,पण आपण मनात येईल ते खाऊ शकत नाही याचाच अर्थ आजच्या परिस्थितीला गरिबीची व्याख्या बदलली आहे. जो भुकेला तो गरीब तेव्हा आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी झोपणार नाही,याची काळजी करणे म्हणजेच परमेश्वरांचे चिंतन करणे होय. समाजातील गरजवंतांना मदत करा,असे कळकळीचे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांनी केले.

 

 

 

बिळूर- बसवेश्वर जयंती दिनाचे औचित्य साधून बिळूर येथे जिवनावश्यक किटचे वाटप करताना बिळूरचे मठाधिपती मुरगेंद्र महास्वामीजी,तुकाराम बाबा आदी.

 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.