
संख/माडग्याळ, वार्ताहर : कोरोना विषाणूशी पुकारलेल्या लढ्यातले आतापर्यंतचे सर्वात मोठे अस्त्र जनता कर्फ्यु हे ठरले आहे. हे जनता शस्त्र जनतेने मोठ्या प्रमाणावर वापरल्याचे दिसून येते आहे. केवळ शहरातच नव्हे तर जत तालुक्यातील खेडोपाडीही बंद हा तंतोतंत पाळला जात आहे. देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जत तालुक्यातील खेड्यापाड्यासह वाड्यावस्त्यावर 100 टक्के प्रतिसाद लाभला.जत तालुक्यातील 126 गावे व सुमारे 1250 वाड्यावस्त्या आहेत.तालुक्यात कोरोनाचे रुग्ण नाहीत तरीही खबरदारी घेण्यात येत आहे. संख,उमदी,माडग्याळ, शेगाव,बिंळूर,डफळापूर या गावात पुर्णत: बंद ठेवण्यात आला.सर्वत्र आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.त्यांच्या बरोबरीने जनताही कमालीची सावध झाल्याचे चित्र आहे.अगदी ग्रामीण भागात कोरोनाची भिती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे जो राज्यात निर्णय होईल तो गावे,वाड्यावस्त्या पर्यत स्व:इच्छेने पाळला जात आहे.