Header Ads

उमदी | कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न


 

 

उमदी,वार्ताहर : विद्यार्थ्यांनी पदवी नंतर स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण घेणे गरजेचे आहे तसेच  सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना कोणतेही तडजोड करू नये कारण तशी सवय लागत जाते आणि त्यामुळे माणसांची प्रगती व विकास खुंटतो असे प्रतिपादन सांगोला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व अर्थतज्ञ डाँ.अ.गो.पुजारी यांनी केले. उमदी ता.जत येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमदी येथे पदवीधर विद्यार्थ्यांना पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पाण्णा होर्तीकर होते तर प्रमुख पाहुणे  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सिनेट सदस्य डॉ. निलकंठ खंदारे उपस्थित होते.

 


 

डॉ.पुजारी म्हणाले की, जीवनामध्ये कोणतेही काम लाज न बाळगता करत राहिल्यास यश मिळत जाते व कोणतेही काम करत असताना एकाग्रता ठेवून काम करावे असे सांगत त्यांनी स्वतःच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच कोणतेही प्रेम निस्वार्थी असावे व त्यामध्ये त्यागाची भावना असावी.माणसाच्या जीवनामध्ये आई हेच प्रेमाचे मोठे मंदिर आहे. शिक्षण हे  कधीही न संपणारी असते व ते कोणाकडून शिकावे याला मर्यादा नसते ते लहान बालकाकडून ही शिकता येते त्यामुळे जी गोष्ट आपल्याला ज्ञात नाही ती गोष्ट शिकण्याचा आपण प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.

प्रा.डॉ.निलकंठ खंदारे म्हणाले की, पुरोगामी विचारांचा वारसा जतन करून त्यांच्या विचाराला अनुसरून विद्यार्थ्यानी वाटचाल करावी. तसेच ग्रंथालयाचा वापर करून विचार प्रगल्भ केल्यास जीवन सुखकर होते व येणाऱ्या संकटावर सुद्धा धैर्याने मात करता येते हे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर म्हणाले की, उच्च शिक्षण हे समाज सुधारण्याचे साधन असून ते तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच  शिक्षणाबरोबर व्यवसायिक ज्ञानसुद्धा आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व आत्मविश्‍वास बाळगल्यास यश निश्चित मिळते असे सांगितले. आणि शिक्षण घेतल्यानंतर आपण कोणत्याही पदावरती जा परंतु आईवडिलांची सेवा करा, भावा बहिणी मध्ये प्रेमाचे नाते जपून ठेवा, घरामध्ये विश्वास राहू द्या,एकत्र कुटुंबात रहा असे त्यांनी सांगितले.

यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस. के. होर्तीकर, संचालक पिरसाब जमादार, उपसरपंच रमेश हळके, आमगोंडा पाटील, रोहीदास सातपुते, प्रा. रमेश खरोशी, प्रा घनश्याम चौगुले, प्रा.मेडीदार एम.आय सह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्या सुरेखा होर्तीकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. टी.ए.महाडिक यांनी तर आभार प्रा.सी.बी.शिलेदार यांनी मानले.

 

 

उमदी : कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे पदवीप्रदान समारंभाची सुरूवात करताना अर्थतज्ञ डाँ.अ.गो.पुजारी,अँड.चन्नाप्पा होर्तीकर आदी.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.