जत | खाजगी सावकार पोलीस कारवाईनंतरही सुसाट |

 

जत,प्रतिनिधी:दिवसभर काम करायचे, आजारपणातील औषधोपचारासह अडीनडीला खासगी सावकाराकडून पैसे उचलायचे, कुणी संसारासाठी तर कुणी चैनीसाठी,मग त्याचे व्याज भरत बसायचे. महिने, वर्ष उलटले तरी मुद्दल फिटत नाही. तरीही सावकाराचा तगादा सुरूच असतो.काही व्यापारी,शेतकरी, बहुतांश चतुर्थ कर्मचारी अशाप्रकारे खासगी सावकारांच्या व्याजात भरडले जात आहेत.जत पोलीसांच्या अनेक कारवायानंतरही परिस्थिती जैसथेच आहे.


खासगी सावकार मात्र त्यांच्या व्याजाच्या जीवावर दिवाळी साजरी करत आहेत.पिक लागवड,आजारपण व कौटुंबिक कार्यक्रमासाठी पैशाची गरज भासते. बँकेत जाऊन कागदपत्रांची जमवाजमव करण्यापेक्षा तत्काळ पैसे मिळण्यासाठी खासगी सावकारांचा आधार घेतला जातो. अशा लोकांना हेरण्यासाठी नोकरीतच असलेले खासगी सावकारही टपलेलेच असतात. त्यासाठी साखळीही असल्याची चर्चा आहे. हजारात रक्कम देऊन लाखाने व्याज वसूल केले जात आहे. त्यातून  कर्मचारी असलेले खासगी सावकार गब्बर बनले असल्याचे सांगण्यात येते.साहजिकच संबंधित कर्मचार्‍यांच्या पगारानुसार वाट्टेल तेवढी रक्कम देण्याची तयारी दाखविली जाते. गरजेनुसार रक्कम देताना पहिल्यांदाच त्याचे महिन्याचे दहा ते वीस टक्के व्याज काढून घेण्यात येते. त्यानंतर कर्मचार्‍यांनी रक्कम उचलल्यावर त्याच्या मागे व्याजाचा फेरा चालू होतो. तो काही केल्या सुटत नाही. संबंधित कर्मचार्‍याचे एटीएम कार्डही खासगी सावकारच काढून घेत आहेत. एटीएम नसेल तर बँकेच्या दारातच खासगी सावकार थांबत असल्याचे चित्र आहे. व्याजापोटी पगार काढून घेतल्यानंतर संबंधित कर्मचारी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत असतो. परिणामी पुन्हा घरखर्चासाठी त्याला सावकाराकडेच हात पसरावा लागतो. त्यासाठी भरमसाट व्याज द्यावे लागते. एखाद्याने पैसे बुडविण्याचा प्रयत्न केलाच तर वसुलासाठी खासगी सावकारांचे पथकही तैनात असल्याची चर्चा आहे.