Header Ads

कोरोना : त्याच्याकडे नाही दया, करुणा, म्हणून लॉकडाऊन करून घ्या ना!


 डॉ.राजेंद्र लवटे यांचा विशेष लेख 


 


मुळात एक वायरस आणि त्याच्यामुळे होणारे रोगप्रसार हे वेगवेगळे असतात. जसे कि एचआईवी या वायरस मुले मुळे एड्स रोग होतो तसेच ‘गोवर’ या  रोगाचा प्रसार करणारा वायरस आहे 'रुबेला.


आजारांचा प्रसार, गंभीरता, थोपवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न व उपचार करण्यासाठी योग्य लस शोधण्यासाठी आजारांना वेगवेगळी नावे देणे गरजेचे असते. जर आजाराला नावाचं नाही दिले तर पेशंटला कोणता आजार  आहे व त्यावर नेमके कोणते औषधोपचार करायचे हे डॉक्टरना समजणे कठीण होईल. त्यामुळे रोगांना विश्व् आरोग्य संघटना (WHO) मार्फत आंतरराष्ट्रीय वर्गीकरण (आयसीडी) International Classification of Diseases (ICD) यामध्ये नाव दिले जाते. एखाद्या वायरस चे नामकरण त्याची प्रयोगशाळेतील निरीक्षणे, त्यावर औषधे, लसी शोधण्याचे काम सोपे व्हावे यासाठी विषाणूंची आनुवंशिक संरचना याच्या आधारे केले जाते. वायरोलॉजिस्ट (विषाणूशाश्त्रज्ञ) इतर क्षेत्रातील वैज्ञानिक समुदायांना सोबत घेऊन हे काम करतात. वायरस चे नाव इंटरनॅशनल कमिटी ऑन टेक्सोनॉमी ऑफ वायरस (ICTV) या संस्थेमार्फत ठेवले जाते


कोरोना शब्दाचा लॅटिन भाषेत इंग्रजीत अर्थ होतो क्राउन म्हणजे मराठीत किरीटधारी मुकुट. सूर्य आणि इतर ताऱ्याभोवती जी छटा असते तिला ‘कोरोना’/ ‘किरीट’ म्हणतात. सूर्याचा कोरोना/किरीट बाहेरील अंतरिक्षात लाखो किलोमीटर पर्यंत पसरलेला असतो जो आपल्याला सूर्यग्रहणावेळी सहज दिसतो. जेव्हा शास्त्रज्ञांनी कोरोना वायरस इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप मधून तेव्हा तो वायरस, मुकुटावरील वर किरीट असते तसे किंवा सूर्याभोवतीचे किरीट असते तसे त्यांना दिसले. वास्तविक सूर्याभोवती असलेल्या किरीटाप्रमाणे  प्रोटीनच्या शाखा उगवलेल्या दिसल्या जशी सूर्यकिरणे. म्हणून याना कोरोना वायरस म्हणतात.


सूर्यग्रहण व कोरोना वायरस मधील कोरोना/किरीटाचे साधर्म्य


कोरोना वायरस (Corona Virus) अथवा COVID-19 हा अनेक वायरस (विषाणु) यांचा एक समूह आहे जो सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये लागण करून त्याचा प्रसार करतो. Corona या विषाणूचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2).  novel म्हणजे नवीन. या विषाणूपासून होणाऱ्या आजाराला COVID-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना वायरस चे अधिकृत नामकरण 11 फेब्रुवारी, २०२० रोजी "COVID-19" असे केले. यात 'CO' म्हणजे कोरोना 'VI' म्हणजे  वायरस आणि  'D' म्हणजे डिसीज आणि यात १९ यासाठी जोडले आहे कारण याची पहिल्यांदा माहिती वर्ष २०१९ लागली. कोरोना विषाणूचा प्रसार सर्वप्रथम गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात झाला होता. हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे. येथून, हा विषाणू संपूर्ण चीनमधील बीजिंग, शांघाय, मकाओ आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचला आणि लोक संक्रमित होऊ लागले. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की या विषाणूचा संसर्ग कालावधी १० दिवसांचा आहे आणि या दिवसात हे टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


व्हायरसचा एक मोठा गट कोरोना विषाणू जो अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशन (सीडीएस) च्या मते, जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. सार्स विषाणूंप्रमाणे आता नवीन चिनी कोरोनो विषाणूला शेकडो संक्रमण झाले आहे. यापूर्वी हा विषाणू डीकोड करणार्या हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील व्हायरोलॉजिस्ट लिओ पून यांना वाटते की हे कदाचित एखाद्या प्राण्यामध्ये सुरू झाले आणि ते मानवांमध्ये पसरले. हा विषाणू एकाच वेळी प्राणी आणि मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. संशोधनात असे समोर आले आहे की हा करोना विषाणू सापांमधून मानवांमध्ये गेला आहे. हा विषाणू प्राण्यांशी संबंधित आहे आणि मांस होलसेल मार्केट, पोल्ट्री फर्म, साप, चमकादड किंवा फर्म एनिमल्स मधुन प्रवेश केला आहे. चीनमधील वुहान बाहेर व्हायरस SARS सारखा धोकादायक आहे.


चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे भारतासह जगातील अमेरिका, तिबेट, थायलंड, जपान आणि मंगोलिया मधील लोकां मध्ये आक्रोश सुरु आहे. या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0)  हा २.७ आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर २ ते ३ जणांना बाधित करू शकतो. आतापर्यंत या वायरस ने संपूर्ण जगात आतापर्यंत या कोरोना विषाणू संसर्गाने १९, २५० पेक्षा जास्त लोक मृत्यू पावल्याचे व सुमारे ४,२७,९४० पेक्षा अधिक जणांना बाधा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. या मुळे जगापुढे न भूतो न भविष्यती असे आरोग्य संकट व आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाची साथ चीननंतर इटालीमध्ये वेगाने पसरली असून बुधवार २५ मार्च या एकाच दिवशी मृतांचा आकडा ७४३ झाला असून आजपर्यंत मृत झालेल्यांचा आकडा ६,८२० इतका झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५९,१३८ इतकी झाली आहे.


भारतातल्या जवळपास सर्व राज्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. भारतात एकूण ६३९ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने घबराट पसरली आहे.सर्वात जमेची बाजू म्हणजे ४७ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईनंतर कोरोना विषाणू दिल्ली, राजस्थान, बिहार आणि इतर राज्यामध्ये हि मध्येही पसरत आहे. महाराष्ट्रात एकूण मृतांचा आकडा ५ असून एकूण १२८ नागरिक बाधित आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण ९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. हे सर्व आकडे वाढण्याची वाढणार आहेत. त्यामुळे सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे.


इतिहास: सुरवातीला MERS आणि SARS कोरोना व्हायरस म्हणून मध्य पूर्व श्वसन सिंड्रोम, ज्याला एमईआरएस विषाणू देखील म्हणतात, पहिल्यांदा मध्यपूर्वेतील देशांमध्ये २०१२  मध्ये आढळून आला. यामुळे श्वसनासंबंधी समस्या उद्भवतात, परंतु लक्षणे जास्त तीव्र असतात. एमईआरएसने संक्रमित केलेल्या प्रत्येक १० पैकी तीन ते चार जणांचा मृत्यू झाला. गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम, ज्याला एसएआरएस (Severe Acute Respiratory Syndrome (गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम) किंवा SARS) देखील म्हटले जाते, हा कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार आहे ज्यामुळे गंभीर लक्षणे उद्भवू शकतात. WHO च्या मते दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतात सर्वप्रथम याची ओळख पटली. यामुळे श्वसनाच्या समस्येस देखील कारणीभूत ठरते, परंतु अतिसार, थकवा, श्वास लागणे, श्वसन त्रास आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते. रुग्णांच्या वयानुसार, एसएआरएस सह मृत्यू दर ०-५० % होते.


कोरोना विषाणूचा प्रसार: प्राण्यांशी मानवी संपर्क होऊन कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो. WHO च्या मते शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की MERS ला उंटांचा संसर्ग झाला आहे, तर सिव्हेट मांजरींना एसएआरएसच्या प्रसारासाठी दोषी ठरविण्यात आले. जेव्हा विषाणूच्या मानवी-मानव-संसर्गाची बातमी येते तेव्हा बहुतेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीस एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या स्राव उघडकीस येते तेव्हा हे घडते. व्हायरस किती व्हायरल आहे यावर अवलंबून, खोकला, शिंकणे किंवा हात थरथरणे हे धोका असू शकतो. एखाद्या संक्रमित व्यक्तीस स्पर्श करणे आणि नंतर त्यांच्या तोंड, नाक किंवा डोळे यांना स्पर्श केल्यासही विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.


"COVID-19" विषाणू बाधित पेशंट खोकला तर त्याच्या तुषारातील कणांमध्ये असलेले विषाणू त्याच्या जवळ संपर्कात असणाऱ्या व्यक्तीने श्वास घेतल्यावर त्याला विषाणूचा संसर्ग होतो. तसेच बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून बाहेर पडलेले तुषार त्याच्या संपर्कात असलेल्या वस्तूवर पडतात व त्या वस्तूला जर आपण हाताने अथवा इतर भागाने, कपडे यांनी स्पर्श केला व ते हात आपल्या चेहऱ्यावर विशेषतः नाक, डोळे यांना लावले तर ते विषाणू आपल्या नाक, घसा याद्वारे फुफ्फुसापर्यंत जाऊन पोहचतात व संसर्ग होतो.


कोरोना विषाणूचा जीवनकाळ: हवा-३ तास, तांबे-४ तास, कागद (नोटा, वह्या, पुस्तक)-१  दिवस, स्टील-२ ते ३ दिवस, प्लास्टिक (मोबाईल, कॉम्प्युटर, पेन, कीबोर्ड)-३ ते ४ दिवस.


आजाराची लक्षणे : कोरोना लोकांना सहसा श्वसनमार्गाच्या रोगाने किंवा सामान्य सर्दीसारखे आजारी बनवून वाहणारे नाक, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, गुदमरणे, अधूनमधून डोकेदुखी ताप आणि कदाचित उलट्या व जुलाब  यासह काही दिवस टिकतो. जर आजार बळावला तर तीव्र घसादुखी, ३८ अंशापेक्षा जास्त ताप येणे , धाप लागणे, छातीत दुखणे, श्वास गुदमरणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर काली होणे, वृद्ध व लहान मुले यांच्यात चिडचिड होणे व झोपाळूपणा वाढणे हि लक्षणे आढळतात. गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, दमा, जुनाट व सतत बळावणारा खोकला, कर्करोग व त्यावर उपचार सुरु असणाऱ्या लोकांना या विषाणूचा जास्त धोका असतो. दुर्बल प्रतिकारशक्ती असलेले लोक, विशेषतः वृद्ध आणि मुले या आजाराला सहज बळी पडतात.


कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उपचार : सध्यातरी कोणतीच लस (Vaccine) उपलब्ध नाही. लस तयार होण्यास व उपलब्ध होण्यास किमान एक ते दीड वर्ष लागू शकतात. हा विषाणू स्वतःचा आकार बदलू शकतो (Mutation) म्हणून लस शोधणे अवघड आणि किचकट काम आहे.


आजाराची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित मान्यताप्राप्त डॉक्टर ना भेटा व नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन 'कोरोना विषाणूच्या निदानाची तपासणी' करून घ्या. पॉझिटीव्ह टेस्ट आल्यास त्वरित कोरोना उपचार कक्षात उपचारासाठी दाखल व्हा. जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार १०० % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे (recover) होताना दिसत आहेत.


मीडियावरील, ऐकीव माहितीवर व अफवांवर विश्वास ठेवू नका. उदा. गोमूत्र, लसूण, काळी मिरची, लवंग या वस्तू आरोग्यासाठी हितकर असतात. पण यापैकी कोणतीच वस्तू कोरोना विषाणूला मारत नाही. यावर कोणतेच संशोधन झाले नाही.अशास्त्रीय उपचार तसेच भोंदू डॉक्टरकडे जाऊन त्याचा सल्ला व उपचार अजिबात घेऊ नका.


कोरोना आजार टाळण्यासाठी आपण काय करू शकतो?


१. कोरोनावर कोणतेही विशिष्ट उपचार नाही. एमईआरएस लसीसाठी चाचण्या सुरू आहेत.


२. बहुतेक वेळा, लक्षणे स्वतःच निघून जातील.


३. जर लक्षणे सामान्य सर्दीपेक्षा वाईट वाटत असतील तर डॉक्टरांना भेटा.


४. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मास्क वापरा


५. डॉक्टरनी दिलेल्या वेदना किंवा तापाच्या औषधाने लक्षणांपासून मुक्त होऊ शकतात.


६. खोलीत ह्युमिडिफायर किंवा कोमट पाण्यांनी आंघोळ केल्यास किंवा घश्यात खोकला किंवा खवखवण्यावर मदत होऊ शकते.


७. शक्य होईल तितके गर्दीची ठिकाणे टाळा.


८. बाजारहाट करताना सुरक्षित असे १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवा. कोणत्याही वस्तूला, माणसाला स्पर्श करू नका.


९. बाजारहाट करून आल्यावर साबणाने हातपाय स्वच्छ धुवून प्रसंगी आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा.


१०. सॅनिटायझर अथवा साबण-पाण्याने वरचेवर हातपाय व चेहरा स्वछ धुवावा.  


११. शिंक अथवा खोकला आल्यास तोंडावर रुमाल अथवा टिशू पेपर धरावा.


१२. वापरलेला टिशू कचरापेटीतच फेकावा व रुमाल स्वछ धुवून वापरावा.


१३. खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरण्याऐवजी कोपरा वाकवून धरावा. 


१४. ताप व खोकला असलेल्या रुग्णाचा संपर्क टाळावा.


१५. सार्वजनिक वाहतूक उदा. बस, रेल्वे, विमान, टॅक्सी यामधून प्रवास करताना कोणत्याही भागाला स्पर्श करू नका. हात स्वच्छ न   


      करता त्यांना आपल्या चेहऱ्यावर आणि तोंडावर लावू नका


१६. जर तुम्ही विषाणूबाधीत भागात प्रवास केला असेल व जर ताप, सर्दी, खोकला व श्वास घ्यायला अडथळा निर्माण    होत असेल  


      तर डॉक्टरांशी संपर्क साधा व त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती व्हा.


१७. आपण आजारी असल्यास मास्क बांधा, घरीच रहा आणि गर्दी टाळा आणि इतरांशी संपर्क साधू नका.


१८. जेव्हा आपण खोकता किंवा शिंकता तेव्हा आपले तोंड आणि नाक झाकून घ्या आणि आपण ज्या वस्तू आणि पृष्ठभागांना स्पर्श 


      करता त्यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करा.


१९. २०१४ च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की गर्भवती महिलांमध्ये, MERS आणि SARS किंवा कोरोना विषाणूचा   


      तीव्र परिणाम होऊ शकतो.


२०. पाळीव प्राण्यांचा संपर्क टाळा. त्यांना स्पर्श करू नका.


२१. काहीही खाण्यापूर्वी साबण किंवा हँडवॉशने आपले हात चांगले स्वच्छ करा.


२२. पूर्ण शिजवलेले शाकाहारी अथवा मांसाहारी अन्न खावे. सीफूड खाऊ नका.


२३. चिकन-मटण प्रमाणित दुकानातूनच घ्यावे.


२४. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.नेहमीच हातामध्ये सॅनिटायझर ठेवा.


२५. रोज तीन लीटर पाणी प्यावे.


२६. पुरेशी व नियमित झोप घ्यावी. जागरण टाळावे.


२७. धूम्रपान व मद्यपान टाळावे. 


२८. आजारी व्यक्तीला वेगळ्या खोलीत ठेवा व त्यांची काळजी घेताना आपले नाक आणि तोंड झाकून स्वतःच्या व दुसऱ्यांच्या  


      सुरक्षिततेची काळजी घ्या.


२९. रुग्णाची भांडी आणि कपडे वापरण्याचे टाळा.


सामाजिक अंतरता (सोशल डिस्टंसिन्ग) व संचारबंदी (लॉक डाऊन) :


सामाजिक अंतरता (सोशल डिस्टंसिन्ग) म्हणजे एकमेकांपासून किमान ५ ते ६ फूट (१ मीटर) अंतरावर राहणे जेणेकरून आपण आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत आणि आपण जर आजारी असलात तर इतरांना संक्रमित करणार नाहीत. जर असे आपण किमान २ ते ३ हफ्ते केलात (जे इटलीने किंवा चीनने केले नाही) तर आपण रुग्णांची संख्या कमी करू शकतो (Flattening the curve) व आपल्या दवाखान्यातील क्षमता अगोदरच कमी आहे त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था देखील सुरळीत राहील.


यासाठी भारत व महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिल, २०२० पर्यंत सलग २१ दिवस संचारबंदी (लॉक डाऊन) लागू केली आहे.  कारण जेंव्हा लोकं एकत्र येतील तेंव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल म्हणून आपली सर्वच कामे (जिवापेक्षा कमीच महत्वाची) टाळावी. उगाच मला काही होणार नाही म्हणून बाहेर पडून इतरांचा जीव धोक्यात घालू नका. कृपा करून सरकारला त्यांचे काम करुद्या. संचारबंदी लागली तरी आवश्यक सोयीसुविधा उदा. किराणा, मेडिकल, दवाखाना, भाजीपाला, बँक, एटीएम, पेट्रोलपंप बंद होणार नाहीत. त्यामुळे म्हणून उगीच घाई करू नका आणि वस्तूंची जमवा जमवी करू नका व त्यासाठी विनाकारण रस्त्यावर गर्दी करून कोरोनाचा प्रसार करण्यास हातभार लावू नका .


एकच गोष्ट लक्षात ठेवा कोरोनावर औषध उपलब्ध नाही. तसेच कोरोना हा देश, राज्य, धर्म, जातपात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता निरपेक्षपणे कोणालाही होऊ शकतो. कोरोनाकडे नाही दया, करुणा त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन करून घ्या ना. असे केल्याने तुम्ही स्वतःचा, कुटूंबाचा, समाजाचा जीव वाचवाल व भारताला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त करून घेण्यासाठी हातभार लावाल.


 


डॉ. राजेंद्र आनंदा लवटे,विभागप्रमुख,


वनस्पतीशास्त्र विभाग,राजे रामराव महाविद्यालय,जत  


Blogger द्वारे प्रायोजित.