Header Ads

| जत | सामाजिक न्याय ही समानता,सन्मानाची संकल्पना : न्यायाधीश एस आर पाटील


 
सामाजिक न्याय ही समानता,सन्मानाची संकल्पना : न्यायाधीश एस आर पाटील

 

जत,प्रतिनिधी : भारतात प्राचीन काळापासून जात, धर्म, वंश, भाषा इत्यादींवरून होणाऱ्या भेदभावामुळे सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर होती. ती विषमता नष्ट करणे व विषमतेमुळे मागे पडलेल्या समाजघटकांना काही सवलती देऊन मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे,  समाजातील कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, किंवा वर्गाच्या व्यक्तीसाठी अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देणे, त्यास विकासाची योग्य संधी देणे, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सबल असलेल्यांकडून दुर्बलांचे होणारे शोषण थांबवणे, उपेक्षितांना समान संधी देण्यासोबतच सुरक्षा प्रदान करणे, तणाव आणि भय यांपासून दुर्बलांना मुक्तता मिळवून देणे, याला सामाजिक न्याय असे म्हणतात. सामाजिक न्याय म्हणजे शोषणविरहीत, समताधिष्ठित, न्याय्य समाजाची निर्मिती होय, असे प्रतिपादन जत दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश सौ. एस आर पाटील यांनी व्यक्त केले. त्या देवनाळ, (ता जत) येथे तालुका विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालय, बार असोसिएशन, पंचायत समिती जत व ग्रामपंचायत देवनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. 

यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एस डी वाघमारे ही उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात बोलताना ते म्हणाले की, भारताच्या संविधानात समाविष्ट असलेली सामाजिक न्यायाची संकल्पना समाजातील असंतुलन नष्ट करून कल्याणकारी राज्यास प्राधान्य देणारी आहे. सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये दलित,आदिवासी, स्त्रिया तसेच अपंग, वृद्ध, मानवी देह व्यापार, बालकामगार, झोपडपट्टी, शिक्षण व आरोग्य अशा उपघटकांचा समावेश होतो.जत विधी सेवा समितीच्या माध्यमातून तालुक्यात वेगवेगळ्या कायद्यासंदर्भात माहिती, सल्ला, मदत व जनजागृती देण्याच्या उद्देशाने अशी शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये तज्ञ वकिल व न्यायाधीशांकडून मार्गदर्शन केले जाते. असे शिबीर देवनाळमध्ये पार पडले. यावेळी अँड.आर.के.मुंडेचा यांनी लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी असणारे कायदे,अँड.एस.बी. सौदागर यांनी जेष्ठ नागरिक कायदा तर अँड.आर.डी.कदम यांनी माहितीचा अधिकार कायद्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर देवनाळ गावाने केलेल्या पानी फाउंडेशनच्या उल्लेखनीय कामाबद्दल व परिवर्तनाबद्दल उपसरपंच राजु कुंभार यांनी उपस्थित वकील, न्यायाधीश व ग्रामस्थांना माहिती दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन न्यायालयीन प्रतिनिधी संतोष पाठक यांनी केले. स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा तुकाराम सन्नके यांनी केले तर आभार अँड.भारत गडदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, पंचायत समिती जतचे अधिकारी व कर्मचारी,अँड.अजित दुधाळ, पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक तुकाराम पाटील, सरपंच महानंदा दुधाळ, ग्रामसेवक आदिक कुंभार, पोलिस पाटील सविता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत शिंदे, मंगल घाटके, कमल शिंदे, विजया दुधाळ, विक्रम कांबळे, सुनिल चव्हाण, तसेच सुरेखा इतापे, ज्ञानदेव दुधाळ, सदाशिव जाधव, विठ्ठल दुधाळ, मोहन शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

देवनाळ ता.जत येथील विधीसेवा आयोजित कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश सौ.एस.आर.पाटील
 


Blogger द्वारे प्रायोजित.