Header Ads

विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत:मच्छिंद्र ऐनापुरे


 




विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत:मच्छिंद्र ऐनापुरे

 

जत,(प्रतिनिधी): जीवनात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचावीत, असे आवाहन ज्येष्ठ लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी जिरग्याळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय लोहार होते.

आठवी इयत्तेच्या बालभारती पाठ्यपुस्तकात 'धाडसी कॅप्टन:राधिका मेनन' या पाठाचे लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी 'लेखक आपल्या भेटीला' उपक्रमाअंतर्गत शाळेला भेट दिली. यावेळी श्री. ऐनापुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आपली आवड जोपासण्याबरोबरच आपल्यापुढे एक आदर्श निश्चित करण्याचे आवाहन केले. श्री. ऐनापुरे यांनी आपल्या लेखनाविषयी सांगताना म्हटले की, मुलांचे मनोरंजन व्हावे, त्यांना संस्काराची जाणीव व्हावी,यासाठी बालकथा लिहायला सुरुवात केली. वर्तमानपत्रे हेच माझे गुरू आहेत. कथा वर्तमानपत्रात छापून येऊ लागल्याने मला प्रोत्साहन मिळत गेले. अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना आपण हॉस्टेलमध्ये शिक्षण घेऊन शिक्षक झालो हे सांगतानाच विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवायला असे सांगितले.

मुख्याध्यापक संजय लोहार म्हणाले की, लेखक कसा असतो, तो का लिहितो असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. म्हणून आम्ही 'लेखक आपल्या भेटीला' हा उपक्रम राबविला. यावेळी मुलांच्या प्रश्नांना श्री. ऐनापुरे यांनी उत्तरे देत संवाद साधला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब वाघमारे यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख रतन जगताप, सदाशिव चिंतामणी, राम राठोड, विजय घुगे, पुष्पा सुतार, विलास मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.