Header Ads

दुष्काळाने शेतकरी अखेरची घटका मोजतायत आतातरी पिकविम्याची रक्कम द्या | संतोष पाटील यांची मागणी






 

माडग्याळ,वार्ताहर : गतवर्षीच्या खरीप हंगामात भरलेल्या डाळिंब पिकविम्याची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली नाही. सततचे दुष्काळ,अतिशय कमी पर्जन्यवृष्टी, आणि अवकाळी पाऊस यामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब बागायदार शेतकरी मेटाकुटीला आला असून नुकसान झालेल्या बागायती पिकामुळे त्यांचा आर्थिक कणा मोडला आहे.फेब्रुवारी महिन्यात ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर येईल असे अपेक्षित होते. परंतू आता मार्च महिना आला तरी  पिकविमा कंपनी आणि प्रशासन शेतकर्‍यांना अंधारात ठेवून चालढकल करते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.तात्काळ फळपीक विमा रक्कम मिळावी अन्यथा पीकविमा कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी दिला आहे.

पुर्व भागात डाळिंबाच्या बागा आहेत.कमी पाण्यावर जास्त फायदा मिळवून देणारे पीक म्हणून डाळिंबाकडे पाहिले जाते. बहुतांश शेतकरी डाळिंब बागायतदार आहेत.गेल्यावर्षी राज्यात आणि देशात पावसाने मोठया प्रमाणावर हजेरी लावली असली तरी जत तालुक्याच्या मधल्या पट्ट्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे जानेवारी पासून जतच्या माडग्याळ, संख, मुचंडी सर्कलमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.खरीप हंगामाच्या सुरूवातीस जेमतेम पाऊस पडला,परंतू नंतर दडी मारलेला पाऊस परतलाच नाही. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील डाळिंब  बाग शेतकऱ्यांचा हातची गेली आहे.  काही शेतकऱयांनी टँकरने पाणी घालून बाग जगवली आहे. त्यामुळे नुकसान अधिक होत गेल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यातच शेतकरी पशुधन कसे जगवावे या चिंतेत सापडला असून आर्थिकदृष्ट्याही पिचलेला आहे. शासनाने जाहिर केलेली पिकविम्याची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांना न मिळाल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकरी अडचणीत आले आहेत.त्यांना पीकविमा रक्कम देऊन दिलासा मिळणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेकडे ओढा वाढल्याचे दिसून येते. कृषी खात्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनु बहुतांश शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतअंतर्गत विमा उतरवला आहे. दरम्यान, विमा कंपन्यांकडून पीकविम्याचे पैसे मिळत नसल्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी पीकतोडणीचा कालावधी, माहिती जमवण्यात उशीर, सरकारकडून सबसिडी देण्यास विलंब व पीकविमा दावे दाखल करण्याच्या तारखांमध्ये चालढकल यामुळे वेळेत दावे निकालात निघत  नाहीत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल कैक पटीने शेतकऱ्यांचा  या योजनेत सहभाग वाढला आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदाची  जत तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळी स्थिती या एकमेव कारणामुळेच शेतकऱ्यांचा विमा योजनेतील सहभाग वाढला आहे.जत तालुक्यातील सुमारे दहा हजाराहून अधिक शेतकरी पीकविमा भरून मिळणाऱ्या लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये  तालुक्यातील माडग्याळ सर्कलमधील पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश असून उर्वरित भागातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. तरी त्यांना केंद्र व राज्यशासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त डाळिंब उत्पादक शेतकऱयांना तात्काळ विकविमा भरपाई त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा अन्यथा कंपनीच्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा संतोष पाटील यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

 

 




 


Blogger द्वारे प्रायोजित.