Header Ads

| एकुंडी | एकूंडी ते अनंतपूर रस्ता बनला मुत्यूचा सापळा | डांबरीकरणाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दिले तहसीलदारांना निवेदन


 

 

जत,प्रतिनिधी : एकुंडी ते अनंतपूर हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणारा मुख्य राज्यमार्ग असूनही शासनाच्या दुर्लक्षामुळे एकुंडी येथे या  रस्त्याची दुरावस्था झाली आहे. प्रवाशांना चालण्यासाठी आणि गाडी चालविण्यासाठी रस्ताच दिसत नाही. रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडूपांचे साम्राज्य वाढले आहे. लोकांना येथून जाताना कसरत करत चालावे लागत आहे.लहान मुलांना शाळेत जाण्यासाठीही त्रास होतो.मागील अनेक वर्षांपासून कर्नाटकातील अनंतपूरला जाण्यासाठी तसेच अथणी-डफळापूर महामार्गाला जोडणाऱ्या एकुंडी-अनंतपूर या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असल्याने आता हा रस्ता त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी जत येथील तहसिलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.

एकुंडी येथे भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे व अनंतपूर येथील आठवडयाच्या बाजारासाठी येथील लोकांना याच मार्गावरून ये-जा करावी लागत असते. अनंतपूर येथे सोमवारी भरत असलेल्या आठवडा बाजारासाठी एकुंडी आणि परिसरातील अनेक गावचे नागरिक याच मार्गाने जात असतात.

एकुंडी व परिसरातील एखादा रुग्ण आजारी असेल किंवा पेशंटला घेऊन रुग्णवाहिका घेऊन मिरजेला या मार्गे जावे लागत असते. खड्ड्यांचा त्रास रुग्णांना होतो व वेळही जादा लागतो. मागील वर्षी झालेल्या पाऊसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहने चालवणे मुश्कील बनत असून दुचाकीवरून आपला जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.1972 च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून खडीकरण झालेल्या या रस्त्यावर गेल्या 30 ते 35 वर्षा पासून साधा मुरूमही टाकण्यात आलेली नाही.

महाराष्ट्राचे परिवहन मंडळाकडून या मार्गावर जत ते बसवेश्वर देवस्थान असलेल्या खिळेगाव पर्यत दिवसातून एक एसटी गाडी आहे. या गाडीला ही खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. अन्य एसटीची सुविधा नसल्यामुळे नागरिक,व्यापारी,शाळकरी मुलांना याचा फटका बसत आहे.या रस्त्याच्या डागडुजीऐवजी डांबरीकरण करावे,अशी मागणी आहे.

 

 

*चौकट*

 

कर्नाटक हद्दीतील याच रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून आता महाराष्ट्र हद्दीतील या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी लोकप्रतिनिधीसह संबधित विभागाने लक्ष घालून त्वरित डांबरीकरण करावे.

 

 

- बसवराज पाटील,सरपंच एकुंडी     

 

 

एकुंडी ता.जत येथून कर्नाटकाला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था

 

 

 
 


Blogger द्वारे प्रायोजित.