Header Ads

2 पेट्रोल पंप,महावितरण,BSNL ला जप्तीची नोटिस | डफळापूर ग्रामपंचायतीचा दणका | धडक कर वसूली मोहिम 


 

 

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसूलीच्या धडक पथकांने दोन पेट्रोल पंप,महावितरण,बिएसएनएलला तातडीने कर भरा अन्यथा जप्ती करू अशी नोटीस बजावली.त्याशिवाय पहिल्याच दिवशी 6 करधारकांच्या दुकानांना सील करण्याची कारवाई केली.त्यामुळे डफळापूरात खळबळ उडाली आहे.पहिल्या दिवशी सुमारे 20 मालमत्ता धारकांकडून 50 हजारांची कर वसूली करण्यात आली आहे.

जत तालुक्यातील सर्वात विकसनशील गाव असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या थकीत करांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे थकीत पाणी,घरपट्टीमुळे ग्रामपंचायतीच्या निधीला जिल्हा परिषदेने कात्री लावली होती.परिणामी गतवर्षी विकास कामावर मोठा परिणाम झाला होता.त्यामुळे यावर्षी अगदी फेंब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून घरपट्टी,पाणी पट्टी वसूलीची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.पंचायत समितीकडून या वसूलीसाठी डफळापूर पंचायत समिती गणात डफळापूरचे ग्रामविकास अधिकारी एस.एस.कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर.ढामसे,एस.एस.खोत,व्ही.एस.भोसले,सौ.आर.बी.जगताप या पाच ग्रामसेवकांचे पथक नेमण्यात आले आहे.ते पथक डफळापूर, मिरवाड,खलाटी,जिरग्याळ,मिरवाड,शिंगणापूर,कुडणूर गावामधिल ग्रामपंचायतीची थकित कर वसूली करणार आहेत. शुक्रवारी या पथकाकंडून डफळापूर मधिल थकीत कर वसूली सुरू करण्यात आली.पहिल्या दिवशी सुमारे 20 मालमत्ता धारकांकडून 50 हजार रूपयाची कर वसूली करण्यात आली.या दरम्यान कर वसूली न देणाऱ्या 6 मालमत्ता धारकांची दुकाने सील करण्याची कारवाई पथकाकडून करण्यात आली.काही वेळानंतर करभरणा केल्यानंतर सील काढण्यात आले.

दरम्यान मोठ्या रक्कमा थकित असणारे करधारक सोपान रामराव शिंदे,यांच्या मालमत्तेतील व्यंकटेश्वरा पेट्रोलियम, वैशाली शंकर सावळे यांच्या मालमत्तेतील शहीद शंकर पेट्रोलियम,महावितरणचे डफळापूरातील सब स्टेशन,बिएसएनलचे डफळापूर येथील कार्यालयाचे थकीत कर आठ दिवसात न भरल्यास मालमत्तेवरील व्यवसाय सील करण्यात येतील अशी नोटिस बजावल्याचे पथकाचे प्रमुख ग्रामविकास अधिकारी एस.एस.कोरे यांनी सांगितले.या धडक कारवाईमुळे डफळापूरात खळबळ उडाली असून वर्षोन् वर्ष थकीत कर ठेवणाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.पहिल्या दिवशी मोठ्या रक्कमा असलेल्या चार मालमत्ता धारकांना नोटिस दिल्या आहेत.आजपासून आम्ही घरोघरी जाणार आहोत.कर भरणा न केल्यास घरातील तेवढ्या किंमतीच्या वस्तू जप्त करण्याचे वरिष्ठ कार्यालयाचे आम्हाला आदेश आहेत.त्यामुळे कर भरणा करून नागरिकांनी सहकार्य करावे असेही यावेळी कोरे यांनी सांगितले.

 

 

 

 

डफळापूर पंचायत समिती गणातील नागरिकांना ग्रामपंचायतीची घरपट्टी,पाणीपट्टी करांची रक्कम तातडीने भरावी,असे आवाहन ध्वनीपेक्षपाने वाहनद्वारे करण्यात येत आहे. आम्ही घरोघरी जात आहोत.नागरिकांनी सहकार्य करून कर भरणा करावा,अन्यथा कारवाई अनिवार्य आहे.

 

- एस.एस.कोरे,वसूली पथक प्रमुख

Blogger द्वारे प्रायोजित.