Header Ads

जत,सांगलीत बंडखोरी होणार ? | नाराज‌ इच्छूकांच्या निर्णयाकडे लक्ष | जतमध्ये तिसरा कोन लढणार?


सांगलीतून पृथ्वीराज पाटील; शिराळ्यातून सत्यजित देशमुख


जतमधून गोपीचंद पडळकर : काँग्रेस, भाजपने दिली उमेदवारी

काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा सांगली विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. दुसरीकडे जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली.

भाजपनेही शनिवारी शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख यांना, तर जतमधून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात इच्छुक असलेल्या अन्य नेत्यांकडून बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.

उमेदवारीसाठी जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. पक्षांतर्गत वाद वाढत असताना उमेदवारीबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. पक्षातील या गोंधळाला व उमेदवारीच्या चर्चाना पूर्णविराम देत काँग्रेसने उमेदवारीची माळ पृथ्वीराज पाटील यांच्या गळ्यात घातली.

भाजप नेतृत्वाचा जतमध्ये स्थानिकांना धक्का 

गोपीचंद पडळकर हे बाहेरच्या तालक्यातील नेते असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी आक्रमक भूमिका जत तालुक्यातील सर्व भा जप नेत्यांनी एकत्र येऊन घेतली होती. पडळकरांना उमेदवारी दिल्यास स्थानिक आघाडी करून बंडखोरीचा इशाराही त्यांनी दिला होता. तरीही भाजपने पडळकरांनाच उमेदवारी देऊन स्थानिक नेत्यांना धक्का दिला आहे.

महायुतीत सर्वाधिक जागा

भाजपला... भाजपने सांगली, मिरजेतील उमेदवार यापूर्वीच जाहीर केले होते. शिराळा व जतमधील उमेदवार शनिवारी जाहीर केल्याने सद्यस्थितीत त्यांच्या वाट्याला जिल्ह्यातील आठपैकी चार जागा आल्या आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघातही भाजप उमेदवार जाहीर करू शकते. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीतून सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात.


जतमध्ये तिसरी आघाडी लढणार!

भाजपने यादी जाहीर केल्याने आता शिराळ्यातून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजपचे सत्यजित देशमुख, तर जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत विरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर असे लढतीचे चित्र दिसत आहे. मात्र, जतमध्ये भाजपने पडळकरांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी होऊन येथे तिरंगी लढत होऊ शकते. या ठिकाणी भाजपचे नेते तम्मनगौंडा रवी पाटील व प्रकाश जमदाडे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.



पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तरी जयश्रीताई पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी यापूर्वीच बंडखोरीचा इशारा दिल्याने पक्षातील संघर्ष यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पक्षीय निर्णयाचे स्वागत केले.



जयश्रीताई पाटील यांनी २८ ऑक्टोबरला रॅलीसह उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय त्यांनी यापूर्वीच घेतला होता. रविवारी या गटामार्फत उमेदवारीबाबतची भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाचे जिल्ह्यातील नेते, वरिष्ठ नेत्यांकडून बंडखोरी थांबविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यात त्यांना कितपत यश येणार, हा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना सतावत आहे.



तीन मतदारसंघाला उमेदवारांची प्रतीक्षा सांगली जिल्ह्यातील आठपैकी पाच मतदारसंघातील

महायुती व महाविकास आघाडीतील लढती स्पष्ट झाल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून मिरज व खानापूर, तसेच महायुतीकडून कडेगाव-पलूस मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणांची प्रतीक्षा आहे.शिराळ्यात महाडिक बंधू काय करणार? शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक व इस्लामपूरमध्ये‌ राहुल महाडिक बंधूंनीही दावेदारी केली होती. परंतु, भाजपने दोन्ही मतदारसंघात महाडिक यांना संधी दिली नाही. त्यामुळे सत्यजित देशमुख यांच्या उमेदवारीनंतर त्यांची भूमिका काय राहणार, यावर येथील लढतीचे चित्र अवलंबून असेल.


Blogger द्वारे प्रायोजित.