Header Ads

सांगली जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार 'सीएमपी प्रणाली'ने होणार


जत ; बऱ्याच अवधीनंतर सांगली जिल्ह्यातील सुमारे सहा हजार प्राथमिक शिक्षकांचा मासिक वेतन आता 'सीएमपी प्रणाली'ने होणार आहे. त्यामुळे आता वेतनास विलंब होणार नसून वेतन दर महिन्याच्या चार -पाच तारखेच्या आत होणे अपेक्षित आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन 1 तारखेला देण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत. निदान 5 तारखेपर्यंत तरी वेतन मिळणे अपेक्षित आहे. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या वेतानाला 20-25 दिवस उशिराच वेतन मिळत आहे. जिल्ह्यात जवळपास सहा हजार प्राथमिक शिक्षक आहेत. वेतन उशिरा मिळत असल्याने विविध पतसंस्था व बँकांकडून गरजांच्या पूर्ततेसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते उशिरा पोहोचल्याने जास्तच्या व्याज आकारणीचा फटका शिक्षकांना सहन करावा लागत असल्याचे शिक्षकांच्या संघटनांनी जिल्हा परिषद अधिकारी-पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.


शाळांकडून वेतन बील निश्चित कालावधीत तयार करुन दिल्यानंतरही तालुका व जिल्हास्तरावर विलंब होतो. प्रत्येक महिन्यात वेतन बील सादर केले जातात तरी काहीतरी उणिवा असल्याने कधी वित्त विभाग तर कधी जिल्हा कोषागार कार्यालयातून ते परत केले जातात. उणिवांच्या पूर्ततेसाठी गंभीरता दाखवित नसल्यानेही वेतन उशिरा मिळते.त्यात बिल जिल्हा कोषागार मधून मंजूर झाल्यानंतर वित्त विभागामार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांना धनादेश दिले जातात. त्यांच्या खात्यात धनादेश जमा झाल्यानंतर त्या-त्या शाळांची वेतन राशी मुख्याध्यापकांच्या खात्यावर टाकली जाते. मग शिक्षकांचे वेतनाच्या राशीचे चेक मुख्याध्यापकांनी बँकेत जमा केल्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर वेतन स्थानांतरीत केले जाते.या कालावधीत सण, सुट्या किंवा बँकेतले कर्मचारी इतर कामात असले तर वेतनात विलंब होतो. 


जिल्ह्यातील सहा हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना 1 तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होती.वास्तविक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीने व्हावा यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा व तालुक्यातील काही शिक्षक व कर्मचारी यांचे प्रशिक्षण जालना येथे घेण्यात आले होते. पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती. जबाबदारी घ्यायला कोणी तयार होत नव्हते. त्यामुळे शिक्षकांचे पगार शालार्थ प्रणालीने पण ऑफ लाईनने होत होते. ही प्रक्रिया अनेक पातळीवर होत असल्याने पगाराला विलंब होत होता. यामुळे शिक्षकांना आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत होते. पण आता सप्टेंबर 2021 चा पगार सीएमपी प्रणालीने झाल्याने शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. यापुढे तरी पगार दर महिन्याच्या पाच तारखेदरम्यान होणे अपेक्षित आहे. 
Blogger द्वारे प्रायोजित.