Header Ads

सांगलीतून सुरेश खाडे यांचे मंत्रीपद निश्चित


सांगली : तब्बल एक महिन्यानंतर होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या टप्प्यात  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि  मिरजेचे आमदार सुरेश खाडे या दोघांचा समावेश  होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे तर खाडे सांगलीचे पालकमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित आहे. याशिवाय साताऱ्याचे शंभूराज देसाई आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दुसऱ्या टप्प्यात मंत्रीपद मिळणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर गेले महिनाभर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा मंगळवारी संपणार असून सकाळी साधारणतः 15 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोल्हापुरातून आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, आणि प्रकाश अबीटकर यांच्या नावांची चर्चा होती. पण, प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात यातील कोणालाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता नसल्याचे समजते. केवळ चंद्रकांत पाटील यांनाच मंत्रिपद मिळणार असून त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यापूर्वी पाच वर्षे ते कोल्हापूरचे पालकमंत्री होते. ते कोल्हापूरचे असले तरी कोथरूड मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले आहेत.


सांगली जिल्ह्यातील अनिल बाबर, सुरेश खाडे यांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत होती. त्यामध्ये खाडे यांनी बाजी मारल्याचे समजते. त्यांचा उद्या कॅबिनेट मंत्री मधून म्हणून शपथविधी होणार असून सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील काहीना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता असून त्यामध्ये यड्रावकरांचे नाव जवळजवळ निश्चित आहे.Blogger द्वारे प्रायोजित.