Header Ads

महिलांचे श्रम कमी करणारी शेती औजारे

 


भारताची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबून असून भारत देशातील बहुसंख्य  लोक शेती व्यवसाय करतात. भारत देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या प्रमाणात आजचा शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित बियाणे, रासायनिक खते व औषधे यांचा वापर भरपूर प्रमाणात करतो. परंतु त्याच प्रमाणात महिलांचे श्रम कमी करणाऱ्या शेती औजारांचा वापर तो करत नाही. भारत देशामध्ये शेतातील मुख्य कामे महिला करतात. परंतु त्या महिला शेतातील काम करताना वेळ जास्त लागतो व काम  कमी होते तसेच काम करत असताना त्यांच्या शरीराला इजा पोचते किंवा जखम होते. परंतु महिलांनी शेतामध्ये काम करताना श्रम कमी  करणाऱ्या शेती औजारांचा वापर केल्यास कमी वेळेत जास्त काम करता येईल. तसेच त्यांना शेतामध्ये काम करताना शारीरिक त्रास कमी होईल. म्हणून शेतकरी महिलांनी श्रम कमी  करणाऱ्या शेती औजारांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल. म्हणून शेतीमध्ये श्रम कमी करणाऱ्या शेती औजारांचा वापर करणे ही एक काळाची गरज बनली आहे. भारतात विविध विद्यापीठे व कृषी संशोधन संस्थांनी विविध सुधारित औजारे तयार केली आहेत. त्यापैकी निवडक औजारांची माहिती पुढीलप्रमाणे:

१.  मका सोलणी यंत्र:

पारंपारिक  पद्धतीने मका हाताने सोलला जातो. त्यामुळे महिलांना श्रम जास्त करावे लागते व वेळही जास्त लागतो. तसेच महिलांच्या हाताला इजा  होते. हे टाळण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करणे जास्त फायदेशीर राहील. मका सोलणी यंत्राची लांबी ६.५ व व्यास ७.५ सेंटीमीटर आहे. त्याचा आकार पाईपच्या तुकड्या सारखा आहे. त्याच्या आतल्या बाजूने  दातेरी पट्ट्या बसवलेल्या असतात. डाव्या हातामध्ये यंत्र पकडून  उजव्या हाताने मक्याचे कणीस यंत्रामध्ये घालून फिरवतात. एक महिला एका तासात २० किलो मका  सोलूण काढू शकते.  मका सोलणी यंत्राचा वापर केल्यास महिलांना कमी श्रम करावे लागते तसेच कमी वेळेत जास्त  मका सोलूण होतो.

२.  हात कोळपे:

पिकांची चांगली वाढ  होण्याकरता  अंतरमशागत होणे अत्यंत महत्वाचे असते. पिकांची  अंतरमशागत करण्यासाठी महिला  खुरप्याचा वापर करतात. त्यामुळे त्यांना कमरेचा, मानेचा व पाठीचा त्रास होतो तसेच वेळही जास्त लागतो. पिकांची अंतरमशागत केली नाही तर उत्पादन घटण्याची शक्यता असते. भारत देशामध्ये आजपर्यंत दहा ते बारा प्रकारचे हात कोळपे तयार करण्यात आले आहेत. म्हणून महिलांनी अंतरमशागत करण्यासाठी हात कोळपे वापरले असता त्यांचे श्रम कमी होईल व कमी वेळेत जास्त अंतरमशागत होईल. हात कोळप्याचा वापर करून एका दिवसात एक ते दीड हेक्टर पिकांमधील अंतरमशागत केली जाते, म्हणून आजच्या दिवसात पिकांमध्ये अंतरमशागत करण्यासाठी हात  कोळपे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकामध्ये आंतरमशागत करताना  हातकोळप्याचा वापर केल्यास महिलांना कमी कष्ट करावे लागते, तसेच कमी वेळेत जास्त काम होते.

३.  भेंडी तोडणी यंत्र:

पारंपारिक पद्धतीने भेंडी तोडण्यासाठी हाताचा वापर  करतात. त्यामुळे भेंडीवरती असलेले बारीक काटे हाताला टोचत असतात. त्यामुळे भेंडी काढण्यासाठी  जास्त वेळ लागतो.  त्यासाठी कात्रीप्रमाणे पाती असलेला चिमटा उपलब्ध आहे. याचा वापर करून महिला भेंडी तोडू शकतात.  भेंडी  तोडणी यंत्राचा वापर करून एक महिला एका दिवसात ६० ते ७० किलो भेंडी तोडू शकते.

४.  भुईमूग फोडणी यंत्र:

भारत देशामध्ये शेंगाचे उत्पादन भरपूर आहे. पारंपारिक पद्धतीने शेंगा  हाताने किंवा दगडाने फोडतात. यामुळे वेळ जास्त लागतो व हाताला इजा होते. शेंगा फोडणी  यंत्रात एक फ्रेम असून त्यात तळाशी एक जाळी दिलेली आहे. या यंत्रामध्ये शेंगा  टाकल्यानंतर दांडीच्या साह्याने शेंगा फोडण्यासाठी  दिलेली दातेरी कास्टिंग  हलवली जाते, कास्टिंग व जाळी यामध्ये शेंगा येऊन त्या फुटल्या जातात. एक महिला एका तासाला दहा किलो शेंगा फोडू शकते. या यंत्राचा वापर महिलांनी शेंगा फोडण्यासाठी केला तर कमी वेळेत जास्त शेंगा फोडता येतील.

५.  सरी-वरंबा पाडण्याचे यंत्र :

पारंपारिक पद्धतीने शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी सरी व वरंबा खोऱ्याने मातीओढून करत असतात. त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागत असतो. तसेच फावड्याने जास्त वेळ माती ओढल्यामुळे त्यांना कंबरेचा, पाठीचा व मानेचा त्रास होत असतो. परंतु शेतकऱ्यांनी सुधारित अवजारांचा वापर केल्यास कमी वेळेत जास्त काम होईल व शारीरीक त्रास कमी होईल. हे यंत्र वेगवेगळ्या रुंदीचे सरी-वरंबा काढण्यासाठी उपयोगी आहे. या यंत्राचा वापर करताना एका महिलेने समोर ओढले व दुसऱ्या महिलेने या यंत्रावर हात ठेवून भार दिला तर चांगल्या पद्धतीने सरी पडू शकते. याचा वापर प्रामुख्याने मिरची, आलं, पालक, मेथी इत्यादी पालेभाज्यांची लागवड करताना होतो. शेतामध्ये सरी काढण्यासाठी यंत्राचा वापर केल्यास कमी वेळेत जास्त काम  होते.

६. कडबा कुट्टी यंत्र:

या यंत्राच्या साह्याने कडबा किंवा वैरण किंवा हत्ती  गवताचे बारीक तुकडे करता येतात. पारंपरिक पद्धतीने शेतकरी कडबा तोडण्यासाठी कुऱ्हाड किंवा कोयता वापरतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कडबा बारीक करण्यासाठी जास्त कष्ट करावे लागते व वेळ देखील जास्त लागतो. कुऱ्हाड किंवा कोयत्याच्या साह्याने कडब्याचे तुकडे मोठे होत असतात. त्यामुळे जनावरे कडब्याची नासाडी जास्त करतात. दिवसेंदिवस शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन करण्यासाठी गाई व म्हशी वापरतात. त्यांना दिवसभर जास्त  चारा आवश्यक असतो. त्यासाठी कडबाकुट्टी जास्त आवश्यक असते.  या यंत्राला एक  मोठे चाक असते. त्यावर सूऱ्या लावलेल्या असतात. एक व्यक्ती वर्म  व्हीलमध्ये  चारा घालते.  या वर्म व्हीलच्या साह्याने  चारा आपोआप पुढे ढकलला जातो आणि चाक  गोल फिरवल्यानंतर  चारा आपोआप कट होतो. या  चाऱ्याचे तुकडे समान अंतराचे असतात. हे यंत्र चालवण्यासाठी दोन  महिलांची आवश्यकता असते. एक महिला वर्म  व्हीलमध्ये चारा घालण्यासाठी व दुसरी महिला चाक फिरवण्यासाठी. या यंत्राच्या साह्याने एका तासाला दोन क्विंटल कडब्याचे एक ते दोन सेंटीमीटर लांबीचे तुकडे करता येतात. हे यंत्र लाईट च्या साह्याने देखील चालवता येते.

७.  ऊस पाचट गोळा करण्याचे यंत्र:

महाराष्ट्र राज्यामध्ये उसाचे प्रमाण खूप आहे. ऊसतोडणी केल्यानंतर उसाचे पाचट गोळा करण्यासाठी  जास्त मजुरांची आवश्यकता असते. एका हेक्टरमध्ये पाचट गोळा करण्यासाठी १० ते १२ मजुरांची आवश्यकता असते. त्यावेळी पाचट गोळा करण्यासाठी या यंत्राचा वापर केल्यास कमी वेळेत कमी मजूर जास्त पाचट गोळा करतील.  पारंपरिक पद्धतीने पाचट गोळा करताना मजुरांना वाकून काम करावे लागते. त्यामुळे त्यांना मानेचा व  कंबरेचा त्रास  होतो. या यंत्राच्या साह्याने मजूर न वाकता काम करू शकतात. म्हणून त्यांना मानेचा व कमरेचा त्रास होणार नाही. हे यंत्र म्हणजे दीड ते सव्वा दोन फूट लोखंडी अँगलला  दर अर्धा इंच अंतरावर तीन इंच लोखंडी सळी लावलेली असते. सळईचे जमिनीतले टोक अनुकुचीदार असते. पाच फूट लांबीचे बांबूचे किंवा हलक्या  पाईपचे हँडल बसवलेले आहे. त्यामुळे नवाकता काम सोपे होते. दोन मजूर एका दिवसात एक हेक्टर वरील पाचट गोळा करु शकतात. या पाचटीचा वापर गांडूळ खत तयार करण्यासाठी होतो. आधुनिक युगातील शेतकरी गांडूळ खताचा वापर जास्त प्रमाणात करत आहेत. म्हणून पाचट गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

८. पोते भरण्याची चौकट:

 हि एक साधी लोखंडी अँगल पासून बनवलेली चौकट असते. चौकटीस हुक दिले असून या हुक  मुळे पोते भरताना होणारा त्रास कमी होतो. पारंपारिक पद्धतीने पोते भरण्यासाठी एका माणसाने पोते धरून उभे राहावे लागते तसेच पोते व्यवस्थितपणे भरता येत नाही. पोते भरण्याच्या चौकटीचा वापर केल्यामुळे संपूर्ण पोते सगळी कडून सारखे भरले जाते. चौकटीची उंची आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येते. या चौकटीचा फायदा शेतकरी  आणि व्यापाऱ्यांना होऊ शकतं.लेखक : डॉ. दादासाहेब खोगरे, विषय  विशेषज्ञ,कृषी विज्ञान केंद्र, तडसर, ता.कडेगाव, जि. सांगली. 

मोबाईल : ९६८९६२४९२७/९३७०००६५९८

Blogger द्वारे प्रायोजित.