Header Ads

हवं शुद्ध पाणी,पण नको नासाडी


अफगाणिस्तान: कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ संयुक्त राष्ट्रची एजन्सी युनिसेफच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातील 11 लाख बालके या वर्षी तीव्र भुकेने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. तीव्र दुबळेपणा हा कुपोषणाचा सर्वात वाईट प्रकार आहे. या आजारात बालकांमध्ये अन्नाची इतकी कमतरता असते की त्याची रोगप्रतिकारक शक्ती काम करणे थांबवते. त्यांना इतर आजार होण्याचाही धोका असतो.अफगाणिस्तानातील कुपोषित मुलांचा हा आकडा पाच वर्षांखालील बालकांचा असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या रुग्णालयांमध्ये उपासमार आणि कुपोषणाने ग्रस्त मुलांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून, संयुक्त राष्ट्र आणि मदत गटांनी लाखो लोकांना अन्न पुरवण्यासाठी अनेक आपत्कालीन कार्यक्रम सुरू केले आहेत, परंतु आता या गटांना बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. त्यांच्याकडे मर्यादित संसाधने आहेत आणि लोकसंख्येच्या गरजा मात्र खूप जास्त आहेत. 


जगभर सुरू असलेल्या अन्न संकटाचा मोठा फटका अफगाणिस्तानलाही बसला आहे. या देशात गरिबी वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, आता पूर्वीपेक्षा अफगाण लोकांना मदतीची गरज आहे. मात्र युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात अन्नधान्याच्या किमती वाढल्या असून अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय मदत देण्याचे आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही.अफगाणिस्तानातील मुलांना पुरेसे अन्नच मिळत नाही, तर त्यांच्या माताही कुपोषित होत आहेत. युनिसेफच्या अहवालात नाझिया नावाच्या 30 वर्षीय अफगाण महिलेचा उल्लेख आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की तिच्या चार मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. नाझिया आणि तिच्या सात वर्षांच्या मुलीवर परवान प्रांतातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही कुपोषित आहेत. अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत कंदहारमधील केवळ एका रुग्णालयात 1100 कुपोषित बालकांना दाखल करण्यात आले, त्यापैकी 30 बालकांचा मृत्यू झाला. कंदहारच्या मागास भागातील जमीलाने सांगितले की, गेल्या महिन्यात तिच्या आठ महिन्यांच्या बाळाचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. विविध देशांमध्ये अन्न कार्यक्रम चालवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्था सध्या अफगाणिस्तानच्या 38 टक्के लोकसंख्येला मूलभूत अन्न पुरवत आहेत. मात्र आता निधीची कमतरता ही मोठी समस्या बनत आहे.गेल्या वर्षाच्या अखेरीस अफगाणिस्तानातील लाखो लोक गरिबीच्या खाईत लोटले गेले होते, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. 

 त्यांना जेवणाचा खर्च भागवणे कठीण होत आहे. अफगाणिस्तानातील सुमारे 3.8 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. तिथली अर्थव्यवस्था ढासळत राहिल्याने आणि अन्न धान्याच्या किमती वाढतच राहिल्याने 2022 च्या मध्यापर्यंत 97 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली असू शकते. संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन एजन्सीच्या ताज्या अहवालानुसार, संघर्ष, आर्थिक संकट आणि कठोर हवामानामुळे 2021 मध्ये जगभरात भुकेने ग्रासलेल्या लोकांची संख्या आणखी वाढली. 4 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2021 मध्ये भुकेची समस्या पूर्वीच्या तुलनेत सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. युक्रेन युद्धामुळे जागतिक अन्न उत्पादनावर परिणाम झाला आहे आणि या संदर्भात, संयुक्त राष्ट्रांनी भविष्यात आणखी अंधकारमय चित्राची भविष्यवाणी केली आहे. संयुक्त राष्ट्रचे म्हणणे आहे की अशा लोकांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचणार आहे, ज्यांना दैनंदिन जेवणाची फारच कमी उपलब्धता असेल.अन्न संकटासाठी संयुक्त राष्ट्रचे जागतिक नेटवर्क, संयुक्त राष्ट्र अन्न, कृषी संघटना (एफएओ) आणि जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांनी संयुक्तपणे म्हटले आहे की भूक समस्या वाढण्यास तीन विषारी घटक जबाबदार आहेत - हवामान बदल, कोरोना व्हायरस साथीचा रोग आणि आर्थिक संकट. 

संयुक्त राष्ट्रच्या मते, 2021 मध्ये 52 देश किंवा प्रदेशांमधील सुमारे 19 कोटी लोकांना अचानक अन्न असुरक्षिततेच्या संकटाचा सामना करावा लागला. हे 2020 च्या तुलनेत पीडितांच्या संख्येत 4 कोटी वाढ दर्शवते. काँगो प्रजासत्ताक, येमेन, अफगाणिस्तान, इथिओपिया, सुदान, सीरिया आणि नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी, इथिओपिया, दक्षिण सुदान, दक्षिण मादागास्कर आणि येमेन सारख्या देशांमध्ये पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना उपासमारीचा धोका होता. बिघडलेल्या हवामानाच्या घटनांमुळे आठ देश किंवा प्रदेशांमधील 2 कोटी 30 लाखांहून अधिक लोकांची परिस्थिती बिघडली आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना अफगाणिस्तान आणि अन्य गरीब देशांमधील अन्न सुरक्षा आणखी बिकट होण्याची शक्यता दिसून येत आहे.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Blogger द्वारे प्रायोजित.