Header Ads

कवठेमहांकाळ येथे तोतया पोलिसांनी वृद्घास लुटले


कवठेमहांकाळ : शहरात विद्यानगर येथे भरदिवसा एका वृध्द व्यक्तीस दोन अज्ञात चोरट्यानी पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि एक अंगठी असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे.व्यकंटेश गोविंद जोशी( वय-७९,रा.- विद्यानगर,कवठेमहांकाळ)यांनी याबाबतची फिर्याद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.सदरची घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.दिवसा ढवळ्या होत असलेल्या चोरीच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

       

याबाबत अधिक माहिती अशी,जोशी व त्यांच्या पत्नी पद्मावती त्यांच्या घराजवळ साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराजवळ फिरत होते.फिरून घराजवळ पोहचताच एका स्कुटीवरून दोन अज्ञात तरुण आले.तुम्ही मास्क का घातला नाही अशी विचारणा त्या तरुणांनी जोशी दाम्पत्यांना केली.त्यावेळी पद्मावती जोशी यांनी आता मास्क सक्ती नाही मग तुम्ही आम्हाला का विचारत आहे?असे म्हंटल्यावर त्या तरुणांनी आम्ही पोलीस आहोत,तुम्ही मास्क लावला नाही,तुम्ही पोलीस ठाण्याकडे चला अशी धमकी दिली आणि जोशी गुरुजी यांना गाडीवर बसण्यास सांगितले.
    

यावेळी पद्मावती जोशी यांनी मी चप्पल घालून येते,सगळे सोबतच जाऊ असे बोलून चप्पल घालण्यास घरी गेल्या असता चोरट्यांनी जोशी यांना जबरदस्तीने गाडी वर घालून भरधाव वेगाने गाडीवरून घेऊन गेले.कन्या प्रशालेजवळ कमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी घेऊन जाऊन चोरट्यांनी जोशी यांना गळ्यातील चेन आणि अंगठी काढून द्या असे सांगितले.जोशी यांनी घाबरून चेन आणि अंगठी काढून दिली.त्यानंतर ते तरुण पसार झाले.जोशी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरी जाऊन घडला प्रकार सांगितला व तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंद केली.
               विद्यानगर येथे पोलीस असल्याचे सांगून लुबाडणूक करण्याचा हा दुसरा प्रकार महिन्याभरात घडला आहे.याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करत असून पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी असा प्रकार घडल्यास त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.