Header Ads

पोलीस असल्याचे‌ सांगत जोडप्याला लुटले | नेलकरंजी-आवटेवाडी रस्त्यावरील घटना ; ९ तोळे सोने लंपास


सांगली: पुढे मंत्र्यांच्या गाड्या येणार आहेत. करोना पसरलाय, तुमच्या तोंडाला मास्क नाही, असा दम भरत दोन भामट्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत एका दाम्पत्याला लुटल्याचा प्रकार घडला आहे. मोटारसायकलवरून चाललेल्या दाम्पत्याचे तब्बल नऊ तोळे सोने लुबाडण्यात आल्याची घटना आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी-आवटेवाडी रस्त्यावर भरदिवसा घडली. याप्रकरणी बाळूताई महादेव गायकवाड यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


आटपाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव गायकवाड त्यांच्याल्या पत्नीसह मोटारसायकलवरून सासरवाडीला निघाले होते. चिंचाळेतून खरसुंडीमार्गे पुढे गेल्यावर नेलकरंजी ते आवटेवाडी रस्त्यादरम्यान दोघा भामट्या तरुणांनी पाठीमागून मोटरसायकलवरून येऊन त्यांच्यापुढे गाडी उभी केली. एकाने जॅकेट तर दुसऱ्याने पोलिसाचा गणवेश परिधान केला होता. दोघांचेही तोंड कापडाने झाकले होते. त्याने गायकवाड दाम्पत्याच्या दुचाकीसमोर दुचाकी लावून त्यांना थांबवले.समोर मोठा अपघात झाला आहे. 

करोना पसरला असून तोंडाला काही न लावता कसे फिरता? पुढे मंत्र्यांच्या गाड्या आल्या आहेत, तुम्ही असे गळ्यात सोने घालून कसे काय फिरताय ? असा दम भरत गळ्यातील सोने काढून पिशवीत लवकर टाका असे सांगितले. पण महिलेने विरोध केला. त्यानंतर दोघांनी महिलेला पुन्हा दम दिला आणि त्यांच्या गळ्यातला पाच तोळ्याचे गंठण आणि महादेव गायकवाड यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन त्यांच्या हाताने प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवण्यास भाग पाडले.

यानंतर दोन भामट्यांनी पिशवीमध्ये गांजा ठेवून कुठे निघाला आहात, असा दम देऊन पिशवी तपासू द्या, असे म्हणत पिशवीत हात घालत सोने काढून घेऊन धूम ठोकली. हा सारा प्रकार काही क्षणात घडला. त्यामुळे गायकवाड दाम्पत्य भांबवले होते. त्यानंतर गायकवाड दाम्पत्याने आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.