Header Ads

पडद्यावरचं देशप्रेमहिंदी चित्रपटसृष्टीचा देशभक्ती' हा विषय आवडता आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आजपर्यंत देशभक्ती सांगणारे असंख्य चित्रपट आले. प्रेक्षकांनीही त्याला पसंदी दिली,हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मनोजकुमार यांचे अनेक देशभक्तीवरचे चित्रपट आले. 'शाहिद', 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती', 'देशवासी' यासारखे अनेक देशभक्तीपर चित्रपट गाजले. त्यामुळे त्यांना मनोज नाहीतर 'भारतकुमार' म्हटले जाऊ लागले. आज काळ बदलला तशी देशभक्तीची व्याख्याही बदलली. पण रसिकांनी हा बदलही स्वीकारला. शौर्यगाथा मात्र त्यांना अधिक भावल्या. देशभक्ती म्हणजे बॉर्डरवरील ऐतिहासिक युद्धपट किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा संघर्ष नव्हे. सध्याच्या काळात विविध घटकांवर होणारा अन्याय-अत्याचार, भ्रष्ट कारभार मोडून काढणे हीसुद्धा एक देश सेवाच मानली जाते. त्यामुळे सलमान खान यांचे 'जय हो' सारखे चित्रपटही याच पठडीत येतात. 

1945 मध्ये 'किस्मत' आला होता. या चित्रपटातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिन्दुस्तान हमारा है' हे गीत प्रचंड गाजले होते. त्यावेळी आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो. 1997 मध्ये आलेल्या जे. पी. दत्ता यांच्या 'बॉर्डर' चित्रपटाने मोठा भाव खाल्ला.या चित्रपटातील गाणी विशेषतः 'संदेसे आते हैं...' हे गाणे आजही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वाजवले जाते. या चित्रपटाचा सीक्‍वेन्स खरा वाटावा यासाठी दत्ता यांनी भारतीय सैनिकांचीही मदत घेतली होती आणि त्यांनाही चित्रपटात सामिल करून घेतले होते.  एवढेच नाही तर एमएमजी रायफल, एलएमजी रायफल, रॉकेट लाँचर, 393 रायफलही वापरण्यात आली.  ही शस्त्रे अस्सल होती, जी जे.पी. दत्ता यांनी विनंती करून ती शिपाई आणि प्रशासनाकडून मिळवली होती. असे म्हणा की 'बॉर्डर'मधील बहुतांश सैनिक आणि शस्त्रे खरी होती. 2003 मध्ये आलेला 'एलओसी कारगिल' या चित्रपटानेही लोकप्रियता मिळवली. भगतसिंग ही चित्रसृष्टीची आवडती व्यक्तिरेखा. त्यांच्यावर 2002 मध्ये अजय देवगणचा 'द लिजेंड ऑफ भगतसिंग', बॉबी देओल आणि सनी देओल यांचा '23 मार्च 1931 शहीद' हे दोन चित्रपट आले. मात्र अजय देवगणच्या चित्रपटाने बाजी मारली. 1965 साली एस.राम शर्मा यांनी भगतसिंग यांच्या आयुष्यावर 'शहीद' चित्रपट बनवला. 1962 साली चेतन आनंद यांचा 'हकीकत'आला. धमेन्द्र आणि संजय खान यांनी या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. भारत-चीन युद्धावर हा चित्रपट आधारला होता. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या तंत्रज्ञानात म्हणावी तशी प्रगती झाली नव्हती पण तरीही चेतन आनंद यांनी युद्धाचे प्रसंग अतिशय सुरेखपणे चित्रित केले होते. त्यामुळे हा चित्रपट आजही सर्वोत्तम युद्धपट म्हणून गणला जातो. यातील 'कर चले हम फिदा' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. मदर इंडिया, सात हिंदुस्थानी, नया दौर, दीवार, लेट्स ब्रिन्ग अवर हिरोज बॅक,1971 अशा चित्रपटांमधूनही चित्रपट  निर्मात्यांनी वेगवेगळ्या प्रकारे देशभक्ती पडद्यावर आणली.

- मच्छिंद्र ऐनापूरे,जत
Blogger द्वारे प्रायोजित.