बस्तवडेतील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रावरून आमदार - खासदार गटात श्रेयवाद रंगला
तासगाव : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज या उपकेंद्राला तत्त्वतः मंजुरी दिली. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील व भाजपचे खासदार संजय पाटील गटात श्रेयवाद रंगला आहे. आपल्याच प्रयत्नातून हे उपकेंद्र बस्तवडे येथे खेचून आणल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. तर दोन्ही गटांचे नेटकरी आपल्या नेत्यांचा प्रचार करून सोशल मीडियावर उर बडवून घेत आहेत.

      

सांगली जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी विविध पक्ष, संघटनांनी केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील चार ठिकाणच्या जागेचा विचार सुरू होता. आपण सुचवलेल्याच जागेवरच हे केंद्र व्हावे, या मागणीसाठी प्रत्येकजण धडपडत होते. याबाबत कुलगुरूंना भेटणे, मंत्रालय पातळीवर आपली बाजू रेटणे, आंदोलन, निवेदने देणे, असे प्रकार सुरू होते.

      

सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील व राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनीही या उपकेंद्राबाबत मागणी लावून धरली होती. दोन्ही नेत्यांनी हे केंद्र तासगाव तालुक्यात व्हावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी खासदार पाटील यांनी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे, कुलगुरू देवानंद शिंदे यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. तर स्व. आर. आर. पाटील, आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांनीही या उपकेंद्राबाबत पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे स्वप्नील जाधव यांनी तर आंदोलन, निवेदने देऊन या उपकेंद्रासाठी शासन दरबारी अनेक हेलपाटे मारले होते.