कटू स्मृती जागी झाल्या


 

30 सप्टेंबर 1993 महाराष्ट्राच्या इतिहासातील महाप्रलयंकारी काळरात्र. गणेश भक्तांची शेवटची रात्र.विसर्जन करून साखरझोप घेणारी निद्रिस्त जनता.उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातील जनतेचा आवाज मातीत गाडलेला दिन. पहाटेचे 6.56 मिनिटे 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप उमरगा व औसा तालुक्यातील 52 गावे भूकंपाने उद्धवस्त केली.अंधारात धुळीचा कल्लोळ पसरलेला.सगळीकडे हाहाकार माजलेला.हाहाकरणे काळीज पिळवटून टाकले होते.प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन धावत होता.जीवाची आकांत करत होता. होते नव्हते एका क्षणात उद्ध्वस्त झाले.

 

असा हा काळाकुट्ट दिवस

 

काळ्याकुट्ट अंधारात प्रत्येक जण आपली माणसे शोधत होता.अनेक माणसे मातीच्या ढिगाऱ्याखाली श्वास घेण्यास तडफडत होती. काय झाले काय नाही कुणास पत्ताच नव्हता. नियतीने सर्व काही भक्ष केले होते. अनेकांच्या मायेचा स्त्रोत हिरावून घेतला होता.अनेकजण पोरकी  झाली.सर्वत्र भयानक शांतता पसरली होती. मदतीची गरज असताना मदत अशक्य होती. एका पाठोपाठ  भूकंपाचे धक्के जाणवत होते. दोन जिल्ह्यातील 27000 घरे बेघर झाली.

 

 

9748 पेक्षा अनेक लोकांचा मृत्यू झाला. 16000 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. अनेक प्राण्यांची जीवितहानी झाली. सर्वत्र मृत्यूचे तांडव दिसत होते. 'मला वाचवा, मला वाचवा' किंचाळणे काळजाचा ठोका आजही मन हेलावून टाकतो. अनेक प्रेतांना एकावर एक अग्नी देण्यात आला. जखमींना ट्रक मध्ये घालून रुग्णालयामध्ये दाखल केले. नियतीने सर्व हेरून हल्ला केला होता. अनेक जण काळजाचा तुकडा गेल्याने पागल झाले होते. भारतीय लष्कराने या भूकंपात अनेक भूकंप पीडितांना जीवदान दिले. सामाजिक संघटनेचा मदतीचा ओघ सुरु झाला.

 

मी स्वतः भूकंपाचे चटके सहन केलेला भूकंपग्रस्त आहे. मी एका ढिगार्‍यातून बाहेर निघून माझ्या आई-वडिलांना सहीसलामत बाहेर काढले. हा प्रसंग आम्हाला आमच्यावरच वाटत होता.जेव्हा बाहेर गेलो तेव्हा धुळीच्या मखमली ने माखलेली लोके पाहत होतो. तेव्हा भूकंपाच्या संवेदना जाणवत गेल्या. बाहेर सर्व लोकांचे रडणे, बोंबलने, धावाधाव, वाचवणे, आर्त अविर्भाव दिसून येत होता. बऱ्याच कटू स्मृती हृदयात घर करून आहेत त्या काढणे म्हणजे जीव परत भूकंपात अडकल्याची भावना अंतर्मनात निर्माण होते.

असा हा कटू स्मृती जिवंत करणारा काळाकुट्ट दिवस.

 

चंद्रकांत कांबळे

उमरगा,उस्मानाबाद

7038269331