Header Ads

सांगली | धनगर समाजाला भ्रमित करण्याचे बक्षिस फडणवीसांनी पडळकरांना दिले ; विक्रम ढोणेचा गंभीर आरोप


पडळकरांची लढाई ही स्वत:च्या आमदारकीच्या सर्टिफिकेटसाठी होती, धनगर समाजासाठी नव्हती! 


सांगली: भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्यापुर्वी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी जाहीर आश्वासने दिली होती. 
नंतरच्या काळात ती पुर्ण न केल्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात समाजात असंतोष तयार झाला होता. तो कमी करण्यासाठी फडणवीस यांनी 
गोपीचंद पडळकर यांना 'आरक्षण आंदोलन' उभे करायला लावून आपला कार्यभाग साधला. पडळकरांना वंचित आघाडीत पाठवून पुन्हा भाजपात घेतले 
आणि आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. हा प्रकार म्हणजे धनगर समाजाला भ्रमित करण्यासाठी दिलेली बक्षिसी आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.धनगर आरक्षणप्रश्नावर राजकीय पक्षांकडून सुरू असलेले व्होटबॅक पॉलिटिक्स उघडे पाडून संबंधितांना जाब विचारण्याचे काम धनगर विवेक जागृती 
अभियानाकडून सातत्याने सुरू आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपुर्वी पडळकर यांनी जाहीर केलेल्या आंदोलनावेळी हे आंदोलन फसवे असल्याचे मत 
अभियानाने मांडले होते. पडळकर हे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी समाजाला फसवत आहेत, ही अभियानाने मांडलेली भुमिका वेळोवेळी सिद्ध झालेली आहे.


पडळकर यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक खानापूर (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढवली. त्यानंतरच्या पुढील काळात ते सांगली ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. ऑगस्ट 2018 पासून त्यांनी 'मी आता माझ्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविणार, आता माझा भाजपचा संबंध नाही' असे सांगून भाजपविरोधात बोलायला सुरवात केली. मात्र ते फडणवीसांविरोधात एक शब्दही बोलत नव्हते. एसटीचे सर्टिफिकेट हाती घेतल्याशिवाय मुंबईतून उठणार नाही, अशी समाजाच्या भावनेला हात घालणारी भाषणे ते करीत होते. हेलिकॉप्टरने त्यांचे राज्यभर दौरे सुरू होते. त्याचवेळी हा सर्व प्रकार 
फडणवीस यांच्या सहमतीने चालला आहे आणि हेलिकॉप्टरसह अन्य सर्व प्रकारची ताकद भाजपच पुरवत असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात पडळकरांच्या तोंडी 
भाजप विरोधाची भाषा होती, ती लोकांना भुलवत होती. पडद्यामागून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे नेते पडळकरांच्या संपर्कात होते. लोकसभा 
निवडणुकीपुर्वी पडळकरांनी महाड ते मुंबई आंदोलन जाहीर केले. या आंदोलनाला सामोरे जावून भाजप नेत्यांनी समाजाला पॅकेज देण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनातून कोणतेही सर्टिफिकेट समाजाला मिळाले नाही. इतर मुद्यावर लक्ष वळवून समाजाला भ्रमित करण्यात आले. त्यानंतर पडळकरांनी फडणवीसांना भेटून अभिनंदन केले होते.


याचदरम्यान, अभियानाच्यावतीने या सर्व मुद्यांचा समाचार घेण्यात आला होता. पडळकरांची लढाई ही समाजाच्या एसटी सर्टिफिकेटसाठी नव्हती तर ती स्वत:च्या आमदारकीच्या सर्टिफिकेटसाठी चालली होती, असे आम्ही सांगितले होते. लोकसभा निवडणुकीवेळी पडळकर हे भाजप नेत्यांच्या परवानगीनेच वंचित आघाडीत गेले होते, नंतर ते विधानसभेला परत आले. विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये परत येत असताना फडणवीसांनी धनगर आणि धनगड एकच असल्याचे एफिडेव्हेट उच्च न्यायालयात दिल्याचे पडळकरांनी धडधडीत खोटे सांगितले होते. ही बाब सुद्ध आम्हीच उघडयावर आणली होती. हे लोकांना समजल्यामुळे बारामतीत पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले.


पडळकरांच्या वर्षभराच्या आंदोलनात आणि राजकीय पक्षांतरांत धनगर समाजाच्या सर्टिफिकेटचा कसलाही प्रश्न सुटला नाही. फडणवीसांनी समाजाच्या हिताचे कोणतेही एफिडेव्हेट दिले नाही. मात्र पडळकरांच्या माध्यमातून समाजात संभ्रम तयार करण्यात फडणवीस यशस्वी झाले. फडणवीस व भाजपच्या राजकीय सोयीसाठी पडळकरांनी समाजाची फसवणूक झाली. त्याचीच बक्षिसी आज पडळकरांना मिळाली आहे. भविष्यात भाजपची आणखी षढयंत्रे उघडी पडतील, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.


-विक्रम ढोणे, जत, जि. सांगली
संपर्क: 9850228598


Blogger द्वारे प्रायोजित.