Header Ads

मराठीचा आवाज केविलवाणा नाही | स्वाभिमान टिकवण्याचे काम सर्वांचे - मुख्यमंत्री


 


‘इये मराठीचिये नगरी’ कार्यक्रमातून विधानमंडळात ‘मराठीचा गजर’


 


 


मुंबई : मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची, या टापांचा आवाज खणखणीत तर  मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीचा आवाज अजिबात केविलवाणा नसल्याचे आणि मराठीचा स्वाभिमान टिकविण्याचे काम अपणा सर्वांचे आहे असे स्पष्ट केले. एवढेच नाही तर मराठी ही छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वासही व्यक्त केला.राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळात ‘इये मराठीचिये नगरी’ या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.मराठीचा आग्रह एक दिवसासाठी, एका वर्षासाठी नाही तर संपुर्ण आयुष्य मराठी, मराठी आणि मराठीच झालं पाहिजे असे आवाहन  करून मुख्यमंत्री म्हणाले की ‘बये दार उघड’ असं सांगणारी भाषा मराठीच, प्रत्येक संकटात धावून येणारी मराठीच, मुगल आणि इंग्रजांना पुरुन उरलेली भाषा आपली मराठीच आहे. त्यामुळे मराठी टिकेल की नाही याची चिंता नको.आज आपल्या ‘आई’चा सन्मान ;आज आपण सर्वमिळून आपल्या आईचा सन्मान करत असल्याची भावना व्यक्त करून श्री. ठाकरे म्हणाले की,  मराठी ही ह्दयावर, डोंगर कपारीत कोरली गेलेली भाषा आहे, आपण बोलत राहिलो तरी ती पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित होत जाईल.  आपल्या भाषेचा एकच दिवस का साजरा करायचा, बरं करायचा तर मराठी भाषा टिकेल की नाही ही चिंता मनात बाळगून तो का साजरा करायचा ? मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा ;जगभरात साहित्य संमेलन, महोत्सवाच्या माध्यमातून मराठीचा जागर होत असतांना मराठीची, मराठी संस्कृतीची ओळख आपल्या पुढच्या पिढीला करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा आहे. तिचा अभिमान, स्वाभिमान टिकवण्याचं काम आपल्या सर्वांचंच आहे. वासुदेव, नंदीबैलवाले, वाघ्या मुरळी  या मराठीच्या सांस्कृतिक परंपरा पुढच्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे.मराठी भाषा अनिवार्य कायद्याचा आनंद ;आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा करण्याचं भाग्य मला मिळालं याचा आनंद वाटत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


 


Blogger द्वारे प्रायोजित.