Header Ads

ग्रामीण परिसर अनेक समस़्यांनी वेढला | गावांना चांगले रस्ते, पथदिवे, नाल्या | पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी मिळणार कधी


  
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत विविध समस्या आहेत. गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत.ग्रामीण भागात कुठलेही नियोजन दिसून येत नाही.
तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त निधीमधून अनेक गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र या नाल्यांची नेहमी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे गटारीतील पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरून वाहते. नाल्या कचरा व घाणीने तुंबलेल्या असल्याने सांडपाणी नाल्यामधून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहाते.अनेक घराच्या परिसरात तसेच वस्त्यांतील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वस्तीतील सांडपाणी वाहणाऱ्या मोऱ्याची साफसफाई नेहमीच करवून घेणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असते. मात्र त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
तालुक्यातील खेड्यांमध्ये रस्त्याची समस्या मोठी गंभीर स्वरूपाची आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दैनावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. गावामधील अंतर्गत रस्तेही उखडून मार्गाची खड्डी बाहेर आली आहे. त्या रस्त्यांना यावेळी मुरूमाची मलमपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर काही ठिकाणी तेही दिसत नाही. खड्यांच्या ठिकाणी वापरण्यात आलेला मुरूमही पाण्याने वाहून गेल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ होण्यास मोठा वाव आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पूर्वी प्रत्येक खेड्यात नागरिक पिण्याचे पाणी विहिरीचेच उपयोगात आणत. मात्र जलवायू प्रदूषणाने विहिरीचे पाणी पिण्यायोग्य न राहता दूषित झाले आहे. शासनाने बऱ्याच योजनेंतर्गत गावाच्या आवश्यकतेनुसार हॅन्ड पंपांची निर्मिती केली. त्या हॅन्ड पंपातून सुरूवातीला पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हायचे. मात्र जसजसे काळ बदलत आहे, तसेतसे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही दूषित होऊन आरोग्यास अपायकारक पाणी निघत आहे. तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. खेडी गावातही काही कुटुंबे मांतबर आहेत. ती कुटुंबे पिण्याचे पाणी शुध्द करण्यासाठी वॉटर फिल्टरचा उपयोग करतात. तर काही नागरिक विक्रीला येणारे पिण्याचे पाणी खरेदी करून कुटुंबाची गरज भागवितात. सध्या उपलब्ध असलेले बहुतांश जलस्त्रोत दूषित असल्यामुळे आणि त्याच स्त्रोताचे पाणी उपयोगात येत असल्यामुळे बऱ्याच नागरिकांना पोटाचे विकार, गॅस, एसीडीटी, मुतखडा, अपचन आदी आजार बळावत आहेत. मात्र या प्रकाराकडे कुणीच लक्ष पुरवित नाहीत.
अनेक खेडेगावात पथदिव्यांची सोय स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी विद्युत खांबावर पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र तेही दिवे सतत बंद असून केवळ खाबांची शोभाच वाढवित आहेत. त्यासाठी नागरिक वारंवार तक्रार करीत आहेत. परिणामी गावात अंधाराचे साम्राज्य कायम राहते. घाणेरड्या रस्त्यावरून वहिवाट करण्यात नागरिकांना कमालीचा त्रास होत असते. परंतु या समस्येवर गांभीर्याने लक्ष देवून समस्या सोडविण्याचे कार्य कुणाकडूनच होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. 

 

जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची आवस्था,तर गटारी अशा तुंडूब भरलेल्या असतात.
Blogger द्वारे प्रायोजित.