Header Ads

कुडनूरच्या ओढ्यावर पूल केंव्हा बांधणार ? | सरपंच अमोल पांढरे आक्रमक,आंदोलनाचा इशारा


 

जत,(प्रतिनिधी):महाराष्ट्र - कर्नाटक तसेच जत आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर वसलेले कुडनूर हे गाव गेली अनेक वर्ष पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. कूडणुर ते कोकळे गावाला जोडणारा व कूडणुरला तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या गावच्या ओढ्यावरील पुलाचा प्रश्न देखील त्यापैकीच एक आहे. या पुलाअभवी गावचा विकासच खुंटला आहे. त्याशिवाय इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रात्री-अपरात्री ग्रामस्थांना बाहेरगावी ये - जा करण्यासाठी अडचण निर्माण होते. इतरवेळी लहान मुले, शालेय विद्यार्थी, स्त्रिया,ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, जनावरे, दुचाकी- चारचाकी वाहनं तसेच अवजड वाहनांसाठीही अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत ग्रामसभेमध्ये या ओढ्यावरील पूल तात्काळ बांधून मिळावा असा ठराव केला आहे. तर हा ठराव गावाचे सरपंच आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते अमोल पांढरे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे दाखल केला आहे.यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे हा पूल केंव्हा बांधून मिळणार अशी विचारणाही केली आहे.कुडनूर हे जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव असून हे गाव महसुली आहे.मात्र जत आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर हे गाव असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील प्रशासनाच्या समन्वयाअभावी कांही कामे खोळंबली आहेत. कुडणुर ते कोकळे हा रस्ता त्यापैकीच एक. गेली अनेक वर्ष हा रस्ता कच्चा रस्ता आहे. त्याचे डांबरी रस्त्यात रूपांतर होत नाही. त्याशिवाय ओढ्यावरच्या पुलाचे असेच काम रखडले आहे.पावसाळ्यात या मार्गाचा संपर्क तुटतो आहे.परिणामी ग्रामस्थांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ते प्रशासनावर आपला राग व्यक्त करत आहेत.एका बाजूला स्मार्ट व्हिलेजची संकल्पना राबवली जात आहे. इतर गावात अनेक विकास कामे होत आहेत. मात्र आपल्या गावाला साधा पूलही मिळत नाही याबद्दल ते आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येत या पुलाची मागणी केली आहे व तसा ग्रामसभेत सर्वानुमते ठरावही केला आहे. 

संरपच पांढरे,विकासकामांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे तालुका आणि जिल्हा प्रशासनासमोर हे प्रश्न आता नव्याने आले आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मागून न्याय मिळत नसेल तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारीदेखील आम्ही ठेवली आहे. त्यामुळे एकंदरीतच कुडनूरच्या रखडलेल्या विकासावर आणि प्रलंबित मागण्यांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती सहकार्य करतात ? त्यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते ? व त्यावर सरपंच आणि ग्रामस्थ हे प्रश्न कशाप्रकारे सोडवून घेतात.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

कोकळे -कुडणूर रस्त्यावर या ठिकाणी पुलाची मागणी आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.