Header Ads

अनियमित वीज बिल वाटपाचा जत तालुक्यातील ग्राहकांना फटका


जत,प्रतिनिधी : वेळेच्या आत वीज देयक देण्याचा आपला शिरस्ता असल्याचा दावा महावितरण कंपनी करते. परंतु मागील काही महिन्यांपासून महावितरणच्या वीज देयक वाटपात अनियमितता दिसून येत आहे. यामुळे वीज ग्राहकांवर आर्थिक भूर्दंड बसत आहे. संगणकाच्या युगात महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे दुष्काळी स्थितीत ग्राहकांना दंड भरावा लागत आहे.
वीज आता प्रत्येकाची गरज झाली आहे. नवीन नियमानुसार सर्वसामान्य वीज ग्राहक दर महिन्याला आलेले देयक जबाबदारीने भरण्याचा प्रयत्न करतो. परंतु वीज ग्राहकाच्या हातात वेळेच्या आत वीज बिलच मिळत नसल्याच्या तक्रारी तालुकाभरातून आहेत. हा क्रम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. परंतु त्याच्यावर महावितरणने तोडगा काढला नाही. तालुका स्तरावर महावितरणने वीज वितरकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून ग्रामीण स्थळी वीज देयके संबंधित कार्यालयात पाठविण्यात येतात. नंतर तालुक्यातील वितरक घरोघरी जाऊन वीज देयके वितरित करतात.
जिल्हास्तरावरून बिल वितरित करण्यासाठी बराच अवधी लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना बिल वेळेत मिळत नाही. डफळापूर, संख ,उमदी ,तिंकोडी, कोतेंबोबलाद, जाड्डरबोबलाद ,बिळूंर, शेगाव ,कुभांरी , वळसंग व अनेक खेडेगावात बिले वेळेत पोहचत नाहीत काही गावात वायरमेनच बिले वाटत आहेत. जत शहराकरिता किमान तीन-चार वितरक नियुक्त करण्याची गरज आहे. कृषी वीज पंपधारक ग्राहकांना सरासरी देयके पाठविण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मीटर रिडींग घेतले जात नाही. त्यामुळे बिलात अनियमीतपणा होत आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.