Header Ads

शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डिजीलॉकरचा वापर करण्याचे आदेश


जत ; शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने तयार केलेल्या डिजिलॉकर या अँपचा वापर करण्याचा आदेश एका परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. यात शिक्षकांची वैयक्तिक शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रशिक्षणाची सर्टिफिकेटस अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र या आदेशामुळे शिक्षकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. यातून शासनाचा कोणता उद्देश सफल होणार आहे, याबाबत चर्चा सुरू आहे.



 शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र शासनाने तयार केलेल्या विविध ऍपपैकी डिजीलॉकर  हे एक अँप आपणा सर्वासाठी आपली वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी डिजीलॉकर या ऍपचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार आहे. डिजीलॉकरमध्ये डाऊनलोड केलेली व अपलोड केलेली कागदपत्रे डिजीटल स्वरुपात असल्याने ती नेहमी आपल्या सोबतच असणार आहेत. आवश्यकतेनुसार याचा वापर करता येईल. 


या डिजीलॉकरमध्ये शासनाकडून ऑनलाईन सेवा उपलब्ध होत असलेली कागदपत्रे डाऊनलोड करुन आपल्या डिजीलॉकर अँपच्या खात्यामध्ये सेव्ह करण्याची तरतूद आहे. या अँपमध्ये 1 जी.बी. क्षमतेपर्यंत डाटा स्टोअर करता येतो. तसेच सदर डाऊनलोड केलेली कागदपत्रे ही मुळ कागदपत्रे समान असणार आहेत. तसेच या प्रमाणपत्राची मुळ प्रत सोबत बाळगण्याची देखील आवश्यकता असणार नाही कारण या ऑनलाईन डाऊनलोड केलेली कागदपत्रास केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान कायदा,2000 मधील तरतुदीनुसार मुळ कागदपत्राचा दर्जा प्राप्त आहे. उदा.पॅनकार्ड,वाहन चालविण्याचा परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र,कोविड लस प्रमाणपत्र व विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे इत्यादी. 


पुढे म्हटले आहे की, उपलब्ध असलेल्या ऑनलाईन प्रमाणपत्राशिवाय आपणांस आवश्यक असणारी अन्य कागदपत्रे उदा.विविध प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे, प्रशस्तीपत्र,वेतनप्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी देखील डिजोलॉकरमध्ये विविध फोल्डरमध्ये अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी सध्या 9 जी.बी. पर्यंत स्टोअरेज करण्याची तरतूद आहे. सदरची कागदपत्रे आपण आवश्यक असेल तेव्हा अँपमधुन डाऊनलोड करुन किंवा खुले करुन योग्य त्या वेळी याचा सहज सुलभ वापर करता येणार आहे. 

Blogger द्वारे प्रायोजित.